भाजपमध्ये धुसफुस वाढतेय; आता प्रणाम, नमस्तेही बंद!

दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजपमध्ये धुसफूस वाढत असल्याचे त्यातून उघड झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आमना-सामना झाला, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले. त्यावरून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात वेगवेगळय़ा प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर तेथील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणूक निकालापासून उत्तर प्रदेशात अनेक घडामोडी घडल्या, जोरबैठका झाल्या. त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे योगी आणि भाजप नेतृत्वामध्ये काही बिनसले तर नाही ना, अशी जोरदार चर्चा आहे. या बैठकीत योगी आदित्यनाथ हे जाणीवपूर्वक अमित शहा यांना टाळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.

आता प्रणाम, नमस्तेही बंद!

अच्छा तर आता प्रणाम, नमस्तेही बंद झाले. भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत इतके गंभीर वातावरण का होते, असा उपरोधिक सवाल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवरून केला. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू असलेल्या घडामोडींवर श्रीनेत यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून बोट ठेवले.

योगींनी केले अमित शहांकडे पूर्ण दुर्लक्ष,व्हिडीओ व्हायरल…

योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत अमित शहा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अमित शहा हे आदित्यनाथ यांच्यापासून तीन खुर्च्या सोडून बसले, तर योगी हे राजनाथ यांच्या बाजूला बसले. शहा आणि राजनाथ आले तेव्हा सर्व मुख्यमंत्र्यांनी दोघांना उभे राहून नमस्कार केला, परंतु योगी आदित्यनाथ यांनी राजनाथ यांनाच नमस्कार केला. अमित शहा यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.