
कोट्यवधी रूपयांची असुरक्षित गुंतवणूक व गैरव्यवहारामुळे अडचणीत सापडलेल्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, व्यवस्थापक संभाजी सीताराम भालेकर याच्यासह संस्थेच्या 12 संचालकांविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला आझाद ठुबे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
ठेवीदार बाळासाहेब तुकाराम वाळुंज (काकणेवाडी, पारनेर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.तक्रारीमध्ये म्हटले आहे की, वाळुंज यांचे राजे शिवाजी पतसंस्थेच्या कान्हूर पठार व टाकळी ढोकेश्वर शाखांमध्ये बचत खाते असून टाकळी ढोकेश्वर येथील खात्यामध्ये 1 लाख 19 हजार 627 इतकी रक्कम आहे. तर प्रत्येकी 1 लाख रूपये रकमेच्या 9 मुदत ठेव पावत्या आहेत. खात्यावरील रक्कम तसेच मुदत संपलेल्या ठेवींच्या रकमेची मागणी करण्यात आल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
बचत खात्यावरील रक्कम तसेच ठेवींची रक्कम मिळत नसल्याने आपणास उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रलोभने दाखवून गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिल्याचे वाळुंज यांनी तक्रारीत म्हटले आहे.
माझ्या बरोबरच सुर्यभान सोन्याबापू मेहेत्रे, गोविंद रामभाऊ पवार, पोपट अवडाजी भालेकर,तान्हाजी भानुदास खोडदे,रघुनाथ ज्ञानदेव खोडदे व इतर अनेक ठेवीदरांनी पतसंस्थेकडे ठेवलेल्या ठेवींची मुदत पुर्ण झाल्यानंतर रकमेची मागणी केली परंतू त्यांनाही रक्कम मिळू शकली नाही असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेकडून ठेवींची रक्कम मिळण्यास टाळाटाळ होऊ लागल्यानंतर सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्या लेखापरीक्षण विभागाने राजे शिवाजी पतसंस्थेच्या व्यवहारांची तपासणी सुरू केल्याचे सांगण्यात आल्याचे वाळुंज यांनी तक्रारीत म्हटले आहे.
60 ते 70 कोटींचे विनातारण कर्ज
पतसंस्थेचा अध्यक्ष आझाद ठुबे तसेच संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने आपल्या नातेवाईकांना कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता, विना तारण 60 ते 70 कोटी रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. या कर्जाची परतफेड होत नसल्याने ठेवीदारांना ठेवींची रक्कम मिळत नसल्याचे वाळुंज यांनी तक्रारीत म्हटले आहे.