
दूधदर प्रश्नाबाबत राज्यात दुधउत्पादक शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यात दूधदराचा प्रश्न तापला आहे. शिर्डीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने शिवसैनिकांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आपला निषेध नोंदवला.
दूध दरवाढी संदर्भात राज्यभरामध्ये मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. दुधाला प्रति लिटर 40 रुपये दरवाढ मिळावी ही दुध उत्पादक शेतकऱ्यांसह आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह दुग्धविकास विभागाचे आयुक्तांसह शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. मात्र या बैठकांमध्ये कुठलही ठोस आश्वासन शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन सुरूच आहेत.
राज्याचे महसूल मंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ल्यातच दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. दुग्धविकास मंत्रांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून निषेध करण्यात आलाय. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी या आंदोलनात करण्यात आली. या आंदोलनावेळी दुग्ध विकास मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येत्या आठ दिवसात दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा अन्यथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला शेणाने आणि गोमूत्राने अंघोळ घालण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते , तालुकाध्यक्ष संजय शिंदे, सुहास वहाडणे, जिल्हासंघटक नानासाहेब बावके , पुंडलिक बावके, सुयोग सावकारे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.