चक्क दारू विक्रीसाठी स्मशानभूमीही सोडली नाही, आष्टीतील संतप्त महिलांनी प्रकार आणला चव्हाट्यावर

>> प्रसाद नायगावकर

अवैध दारू विक्रीसाठी लोक काय काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. एका गावठी दारू विक्रेत्यांनी चक्क नवीनच शक्कल लढवली आहे. सर्व साधारणपणे सामसूम असलेल्या स्मशान भूमीवर चक्क त्यांनी गावठी दारूचे छुपे दुकान थाटले. सोबत चकण्यासाठी फुटाणे आणि मुरमुरेही ते विकत होते. विशेष म्हणजे या गावाला लागून वर्धा नदी आहे आणि बाजूला वर्धा जिल्हा जिथे संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी आहे . यामुळे या भागात हा अवैध धंदा एखाद्या कुटीर उद्योगासारखा चालायचा. शेवटी संतापलेल्या महिलांनी पुढाकार घेत या अवैध दारू विक्रेत्यास रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले .

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील आष्टा या गावी हा सर्रास प्रकार सुरु होता. काही दिवसाआधी राळेगाव पोलीस स्टेशन वर धडक देऊन अवैध्य दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक दिली होती, मात्र नेहमीच्या सवयी प्रमाणे राळेगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले अखेर संतापलेल्या महिलांनीच पुढाकार घेऊन दारू पकडली. विशेष म्हणजे ही दारू विक्री स्मशानातं सुरु होती. ज्या व्यसनाधीनतेमुळे प्रकृती खराब होऊन अखेर स्मशानात जायची वेळ येते त्याच ठिकाणी हा अवैध धंदा फोफावला होता. या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी सचिन कांबळे याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 / फ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई राळेगाव पोलीस करत आहे. गावात पुन्हा अवैध्य दारूविक्री सुरु झाल्यास राळेगाव पोलीस स्टेशन समोर गावातील महिला आमरण उपोषण करतील अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे.