
पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. सरकारच्या यंत्रणेचे विमा कंपन्यांना अभय आहे का? पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सरकारला विचारला आहे. मोताळा तहसील कार्यालयावर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोर्चा काढला. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबाद, असा कसा देत नाही अन् घेतल्याशिवाय राहत नाही, अशा विविध घोषणा मोर्चात सहभागी झालेल्या शेतकरी व शिवसैनिकांनी दिल्या.
संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर , जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व अन्य शिवसेना पदाधिकारी निवेदन घेऊन तहसील वर निघाले असता या निवेदन शिष्टमंडळाचे मोर्चात रूपांतर झाले. उत्स्फूर्तपणे मोताळा तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. या निवेदनात नमूद आहे की, अस्मानी संकटाच्या छायेमध्ये काही ठिकाणी सुलतानी कारभाराचा फटका देखील शेतकऱ्यांना बसत आहे. पिक विमा हा हक्काचा असतानाही त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या संदर्भात गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता पदरमोड करून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पीक कर्ज वाटपाची संथगती सुद्धा शेतकऱ्यांना मारकच ठरली आहे.
मोताळा तहसील अंतर्गत 707 शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेबाबत सहा महिने आधी तक्रारी केल्या आहेत. अजूनही त्यांना कृषी विभागाने लाभ दिला नसल्याचे वास्तव आहे. शेती सिंचनाशिवाय अपूर्ण आहे. मात्र ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे दोन वर्ष झाले तरी अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. या समस्यांना न्याय कधी मिळेल हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे पिक विमा तात्काळ मिळावा, पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळावा. सिंचनाचे अनुदान प्राप्त व्हावे. महाडीबीटी वर शेतकऱ्यांनी ऑनलाइन केलेले अर्ज निकाली काढून तात्काळ संमती मिळावी. अलीकडेच तालुक्यात चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात पडलेले खांब उभे करून रोहित्र सुरू करण्यात यावे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या घरांना प्रलंबित निधी मिळावा, या आमच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ही शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत त्यांनी दिला.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, युवा सेना तालुका प्रमुख ओमप्रकाश बोर्डे, की से ता प्र सुधाकर सुरडकर, गजानन कुकडे, सागर घोंगटे, संदीप पाटील, भागवत शिकारे,राजु बोरसे, प्रा सदानंद माळी, मंगेश बंडे पाटील, मुश्ताक पटेल, अनिल बोरले, सागर भोंडेकार, रवींद्र पाटील, अरुण वाकोडे, प्रतिभा बोरसे, मनीषा जाधव, उर्मिला वखरे, यांच्या सह मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव शिवसेना, महीला आघाडी, युवासेना, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.