Paris Olympics 2024 Hockey – कर्णधार हरमनप्रीतचा अखेरच्या क्षणी निर्णायक गोल, हिंदुस्थान-अर्जेंटिना सामना बरोबरीत

हिंदुस्थानचा पुरूष हॉकी संघ आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात हिंदुस्थानच्या संघाला सामना बरोबरीत रोखण्यात यश आले. कर्णधार हरमनप्रीतने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे पराभवाची नामुष्की टळली. हिंदुस्थानचा पुढचा सामना आता आयर्लंडविरुद्ध 30 जुलै रोजी होणार आहे.

हिंदुस्थानच्या पुरूष हॉकी संघाने पहिल्या सामन्यात न्युझीलंडचा 3-2 अशा फरकाने पराभव करत विजयी सलामी दिली होती. हिंदुस्थानचा दुसरा सामना आज (29 जुलै) अर्जेंटीनाविरुद्ध पार पडला. या सामन्यामध्ये हिंदुस्थानच्या संघाला एकूण 10 पेनेल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यातील एकाच पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्यात संघाला यश आले. सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 7 व्या मिनिटाला लुकास मार्टिनेजने पावरफूल शॉट मारत गोल केला आणि अर्जेंटिनाला 1-0 अशी बढत मिळाली. ही बढत 59 व्या मिनिटापर्यंत अर्जेटिनाने कायम ठेवली. या दरन्यान हिंदुस्थानला लगातार चार पेनेल्टी कॉर्नर मिळाले. परंतु तीन पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्यात कर्णधार हरमनप्रीत सिंह अयशस्वी ठरला. अखेर चौथ्या पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर हरमनप्रीतने गोलमध्ये केले आणि सामना बरोबरीत आणला. हिंदुस्थानचा पुढचा सामना आता 30 जुलै रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे.