भंडारदरा व फोफसंडीत तरुणाईची जत्रा, चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेत आदिवासी फोफसंडी व भंडारदऱ्यातील निसर्गरम्य परिसरात विकेन्ड काळात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने या परिसरातून जलोत्सव जत्रेचे स्वरूप आले. सुमारे आठवड्यापासून या परिसरातून संततधार सुरू आहे. यामुळे येथील काळ्याकभिन्न भयान कातळकड्यांवरून फेसाळत जामिनावर फेसाळत मुक्त ओसंडून वाहणारे शेकडो जलप्रपाद पाहण्यास शुक्रवारी सायंकाळपासूनच पर्यटकांनी फोफसंडी व भंडारदऱ्याची वाट जवळ करायला सुरुवात केलेली. शनिवारी, रविवारी तर येथील पावसांत व धबधब्याखाली मनसोक्त चिंब चिंब भिजून येथील निसर्गमनोहर वातावरणाचा आनंद घेण्यास तरूणाईला बहर आला.

या विकेन्ड कालावधीत सुमारे 9 हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. परिणामी या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या बेशिस्त वर्तनातून व पर्यटनस्थळी पार्किंगची स्वतंत्र सोय उपलब्ध नसल्याने वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागे. अर्थातच अशावेळी पर्यटकांना रस्त्यावरच अडकून पडावे लागे. या वेळेत तरूणाईने गाडीतून उतरून आपल्या आवडत्या उडत्या चालीवरील गाण्यावर जसे जमेल तसे नृत्य नाही तरच नवल. पावसात चिंब होऊन वाहतूक सुरळीत होईपर्यंत चाललेले हे नृत्य अविष्कार वाहतूक पूर्ववत झाल्यावर मात्र गाडीत बसून शांत होई. शुक्रवारपासून रविवापर्यंत विकेन्ड काळात कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसरासह भंडारदऱ्यात सुरू असलेला ही जलोत्सव जत्रा सोमवारी सकाळनंतर मात्र लुप्त झाली.

जून महिन्यातील मृग नक्षत्रापासून सुरू होणारा मान्सून जवळपास 15 दिवसांहून अधिक काळानंतर सुरू झाला. या परिसरावर रूसलेला वरुणराजा खऱ्या अर्थाने जुलै महिन्यात मेहरबान झाला. येथील डोंगररांगांनी हिरवा शालू परिधान करण्यास सुरुवात केली. काळ्याकभिन्न कातळावरून असंख्य धबधबे कोसळू लागले. भंडारदरा धरण रिंगरोडच्या कातळावरून धरतीवर धबधब्यांच मालिकाच सूरू झाल्या. पर्यटकांचे आकर्षण सर्वागसुंदर वसुंधरा फॉल फेसाळत कोसळू लागले तसे अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे येथून पर्यटक येऊ लागले. यांसह मुंबई, संभाजीनगर, ठाणे जिल्ह्यांतून पर्यटकांची संख्या वाढली. भंडारदरा परिसराची भूरळ गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पडलीय. भंडारदर रिंगरोड क्षेत्रात निसर्गरम्य पर्यटनस्थळे हुंदडत आनंद द्विगुणित करतात. कोलटेंभे गावाजवळील अजस्र फॉल, प्रवरा नदीचे उगमस्थान असलेल्या रतनवाडी जवळचा वसुंधरा फॉल, बाहुबली धबधबा, नान्ही फॉल, नेकलेस फॉल अवर्णनीय आनंद देतात. सांदणदरीचा रिव्हर्स फॉल, घाटघरचे भयान कोकणकडे, पांजरे येथील वैशाली धबधबा ही पर्यटकांची आकर्षणस्थळे ठरलीत. या पर्यटनस्थळांना भेट देऊन तेथे धबधब्याखाली चिंब होऊन मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. विकेंडचे औचित्य साधून फोफसंडी व भंडारदरा धरण परिसरातून शुक्रवारपासून रविवापर्यंत पर्यटकांची जत्रा सोमवारी सकाळनंतर मात्र ओसरली.

सोमवारी (29 जुलै ) सकाळनंतर धरण स्थिती

भंडारदरा धरण – 9390 दलघफूट (85 टक्के)
निळवंडे धरण – 4015 दलघफूट (50 टक्के)
आढळा धरण – 901 दलघफूट (90 टक्के)
वाकी ओव्हर फ्लो – 789 क्युसेक्स

सोमवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांतील पाऊस व कंसात 1 जूनपासूनचा एकुण पाऊस. भंडारदरा 30 (1159), घाटघर 65 (2185), पांजरे 49 (1834), रतनवाडी 58 (2021), निळवंडे 5 (684), आढळा 2 (242), अकोले 5 (536) मिलिमीटर.