आगामी विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला नगर येथे दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असा शब्दही त्यांनी दिला.
मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नगर येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिष्टमंडळाला सदरचे आश्वासन दिले.
या वेळी मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की, ‘आज सकल मराठा समाजाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार असतील तर राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देईल. आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावू. मराठय़ांना ओबीसीतूनच आरक्षण मिळेल,’ असे संकेत त्यांनी दिल्याचे दांगट यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेन, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे मराठा कार्यकर्ते मदन आढाव यांनी सांगितले.