‘पुण्यातील नियोजनशून्यतेमुळे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झाले आहे. सत्ताधारी आणि बिल्डर लॉबी यांची अभद्र युती या पुराला जबाबदार आहे. साबरमती नदीकाठचा प्रकल्प गुजरातमधील आर्किटेक्टच्या माध्यमातून पुण्यात कॉपी-पेस्ट करण्यात आला आणि पुणे उद्ध्वस्त केले,’ असा हल्लाबोल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.
पुण्याला गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील साबरमती नदीकाठी केलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर भाजपने पुण्यात तसाच प्रयत्न केला. मुळा-मुठा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नद्यांमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद केले आहे. त्यामुळे पुण्यात हा पूर आल्याची टीका होत आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘ पुण्यातील नदीचा प्रवाह लक्षात न घेता हा प्रकल्प आखण्यात आल्याने हा पूर आला आहे. पुण्यातील नदीकाठचा प्रकल्प हा आंधळेपणाने तयार केलेला प्रोजेक्ट आहे. पर्यावरण मंत्री असताना मी हा प्रोजेक्ट थांबवून पुन्हा संपूर्ण प्रोजेक्टची आखणी करण्यास सांगितली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिका आणि मिंधे सरकार या प्रोजेक्टला पाठिंबा देत आहेत. पुण्यातील अनेक शहरे विकासकांनी व आर्किटेक्टनी याविरोधात आवाज उठविला आहे. मीदेखील आवाज उठवलाय. हा प्रोजेक्ट पुण्यासाठी अडचणीच निर्माण करणार आणि यंदाच्या पुराच्या माध्यमातून आपण त्याचे परिणाम पाहिलेच आहेत. नदीकाठची बांधकामे ही तत्काळ थांबविली पाहिजेत. नद्या स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. डेब्रिज नद्यांमध्ये टाकून त्या नदीचे काँक्रीटीकरण पिंवा काँक्रीटचे डबके बनवायचे नाही,’ असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.