वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस डॉ. पूजा खेडकर यांच्याबरोबरच कुटुंबीयांचेदेखील कारनामे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांचे ‘बारामती कनेक्शन’ समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. आता त्या सात-बारावरील नावात ‘दिलीप धोंडीबा खेडकर’ऐवजी ‘दिलीप कोंडीबा खेडकर’ असा बदल केल्याचे समोर आले आहे.
दिलीप खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी 14 गुंठे जमीन बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे खरेदी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय पुंभार यांनी समोर आणली. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावून जमीन विकायला काढली आहे. दीड कोटी इतकी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर जमीन आहे; पण यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. वाघळवाडी येथे असलेल्या खेडकर यांच्या सात-बारा उताऱयावर ‘नावाची स्पेलिंग दुरुस्ती’ असा बदल करण्यात आला आहे. ‘दिलीप धोंडीबा खेडकर’ऐवजी आता नवीन नाव ‘दिलीप काsंडीबा खेडकर’ असा नावात बदल करण्यात आला आहे. वादाच्या भोवऱयात अडकलेल्या खेडकर कुटुंबातील सदस्यांवर चौकश्यांचा ससेमिरा लागला असताना सात-बारावरील नोंद दुरुस्त केल्याने अगोदर नावांचा घोळ समोर आला आहे. आता नव्याने सात-बारावरील नाव बदल्याने दिलीप काsंडीबा खेडकर आणि दिलीप धोंडीबा खेडकर कोण? की दोन्ही व्यक्ती एकच आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.