देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे असेल आणि तळागाळातल्या माणसांना न्याय मिळायला हवा असेल तर त्यासाठी तळागाळापर्यंत कायदेशीर मदत पोहोचली पाहिजे. तुम्ही कायदेशीर मदत तळागाळापर्यंत पोहोचवा, अशी सूचना शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी शिव विधी व न्याय सेनेच्या कार्यक्रमात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना भवन इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर, पुणे, उरण आणि विविध जिह्यांतून 200 हून वकील उपस्थित होते.
शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्य ही शिवसेना पक्षाची अंगीकृत संघटना असून कार्यक्रमात भारतीय दंड विधानाऐवजी लागू करण्यात आलेल्या ‘भारतीय नागरिक संहिता’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी बार काwन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालायाचे ज्येष्ठ व अनुभवी वकील अॅड. सुदीप पासबोला यांनी फौजदारी कायद्यांमधील नवीन बदल आणि प्रक्रियेबाबत माहिती दिली तर कायदा हा तळागाळातल्या लोकांसोबत ग्रामीण स्तरावरील महिलांपर्यंत पोहोचावा, याकरिता शिव विधी व न्याय सेनेने जिल्हा, तालुका अशा प्रत्येक स्तरावर काम करून संघटना आणि पक्ष विस्तारात सहभागी व्हायला हवे, असे आवाहन उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. यावेळी उपस्थितांना संघटनेच्यावतीने नवीन कायद्यांवर आधारित “बेअर अॅक्ट 2024’’ या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना सचिव पराग डाके, संघटनेचे मार्गदर्शक अॅड. जगदीश सावंत, अॅड सुभाष सुर्वे, अॅड. सतीश सकट, संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनावणे, उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड, चिटणीस अॅड सुमित घाग, चिटणीस अॅड. ज्ञानेश्वर कवळे, समन्वयक अॅड. भूषण मेंगडे, अॅड. गिरीश दिवाण उपस्थित होते. सूत्रसंचालन मीडिया समन्वयक अॅड. दर्शना जोगदनकर यांनी तर प्रास्तविक उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड यांनी केले. आभारप्रदर्शन विदर्भ अध्यक्ष अॅड. वर्षा जगताप यांनी केले.