मनूवर शुभेच्छांचा वर्षाव

manu-bhaker-youth-olympic

पॅरिस ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्यानंतर नेमबाज मनू भाकर हिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने तिचे अभिनंदन केले आहे.

मनूचा पराक्रम अनेक खेळाडूंना प्रेरणा देणार आहे, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. मोदी यांनी रविवारी मनू भाकरशी फोनवरून संवाद साधला आणि 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिल्याबद्दल प्रशंसा केली. संपूर्ण देशाला तिचा अभिमान असल्याचे पंतप्रधान मोदींनी मनूला सांगितले.

कुटुंबीयांचा हर्ष गगनात मावेना…
हरयाणातील झज्जर येथील तिच्या निवासस्थानी कुटुंबीयांचा आनंद आज गगनात मावेनासा झाला होता. तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले, शेवटी मनूने तिचे लक्ष्य साध्य केले, असे तिचे वडील रामकिशन यांनी सांगितले. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिला असेच आशीर्वाद देत राहाल, असे तिची आई सुमेधा म्हणाली. आजी दया कौर यांनीही तिला भरभरून आशीर्वाद दिले. नात घरी आली की तिला सोन्याची चेन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.