पोर्तुगाल येथून ग्रीसला जाणाऱ्या एका नौकेला भूमध्य सागरात पाच किलर्स व्हेल्सनी घेरले आणि समुद्रात बुडवले. एक कोटी रुपयांचीही ही नौका होती. तब्बल दीड तास व्हेल्स माशांनी नौकेला धडक देऊन ती तोडून टाकली.
ही घटना 24 जुलै रोजी घडली. 59 वर्षांचे रॉबर्ट पॉवेल वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत दहा दिवसांच्या सागरी सफरीवर निघाले होते. त्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर 22 तासांनी व्हेल माशांच्या ग्रुपने त्यांच्या 39 फूट नौकेवर हल्ला चढवला. हा प्रकार घडला तेव्हा स्पेनचा किनारा दोन मैल दूर होता. नौकेवरील क्रू मेंबर्सनी मदतीचा अलर्ट पाठवला. त्यानंतर एक स्पॅनिश व्हेसेल मदतीला आली आणि तिने नौकेवरील सर्व जणांची सुखरूप सुटका केली. काही मिनिटांतच नौका भूमध्य सागरात 130 फूट खोल बुडाली.
फटाके फोडले, इंजिन बंद केले…
किलर व्हेल्स म्हणजे ओर्कास. काळय़ा आणि सफेद रंगाच्या व्हेल्सची ही मोठी प्रजाती आहे. त्यांनी झुंडीने येऊन नौकेवर हल्ला चढवला. त्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी पाण्यात फटाके फोडले, जेणेकरून त्या आवाजाने ओर्कास मागे फिरतील. त्यांनी नौकेचे इंजिनही बंद केले. मात्र तरीही किलर व्हेल्स हल्ला करत सुटले होते. याआधीही मोरक्को येथे किलर व्हेल्सनी 50 फूट लांब नौका बुडवली होती.