कोरोना व्हायरसनंतर आता जगभरात नोरो व्हायरसची दहशत पसरली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियात नोरो व्हायरसचा उद्रेक झाला. सुमारे एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले. त्यानंतर आता हिंदुस्थानात हैदराबादमध्येही या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. अनेकांना उलटय़ा-जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. दूषित पाणी आणि अन्नामुळे नोरो व्हायरसचा संसर्ग होतो. हा साथीचा आजार असल्याने त्याचा वेगाने फैलाव होत आहे. खबरदारी घेतल्यास हा आजार टाळता येतो. त्याप्रमाणे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हैदराबाद येथील जुने शहर परिसरात अनेकांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास होत आहे. नोरो व्हायरसचे दिवसाला शंभर रुग्ण तरी सापडत आहेत. डबीर पुरा, याकूत पुरा, पुराण हवेली, मुघल पुरा, मलक पाटे आदी भागातील लोक आजारी पडत आहेत.
आजाराची लक्षणे काय…
वारंवार उलटय़ा होणे, लाळ सुटणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे, तीव्र पोटदुखी, अत्यंत थंडी जाणवणे, संधिवात, डोकेदुखी ही नोरो व्हायरसची लक्षणे आहेत. दूषित अन्न आणि पाण्यामुळे नोरो व्हायरसचा संसर्ग होतो. प्रदूषित वातावरणामुळेही या विषाणूचा प्रसार होतो. हा संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीला लागण होते.