
देशाच्या सुरक्षेशी समझोता करणारी आणि सैनिकांच्या भविष्याचा खेळ करणारी अग्निवीर योजना केंद्रात सत्ता बदल होताच रद्द करू, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. जुन्या पद्धतीने तरुणांना लष्करात भरती करायला हवे, अशी जोरदार मागणीही त्यांनी एक्सवरून केली.
अखिलेश यादव यांनी अवधेश सिंह यांचा व्हिडीओ शेअर करत ही घोषणा केली. या व्हिडीओत अवधेश सिंह बोलताना दिसत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र म्हणतात अग्निवीर योजनेवरून विरोधी पक्ष चुकीची माहिती पसरवत आहेत. परंतु, खरी परिस्थिती ही आहे की, सुरुवात त्यांनीच केली आहे. केवळ चार वर्षांसाठी अशी व्यवस्था कोणीच केली नव्हती. ही त्यांनीच केली आहे. अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे मनोधैर्य खचले आहे. तरुणांच्या मनात सध्या एकच विचार सुरू आहे. चार वर्षं संपल्यानंतर त्यांचा इन्कम सोर्स काय असेल. या व्हिडीओत अवधेश सिंह बोलत आहेत की, केंद्रात आपले सरकार आल्यास अवघ्या 24 तासात अग्निवीर योजना बंद करण्यात येईल. आपला शब्द कधीच इकडे तिकडे होत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.