मंडपाच्या भाड्यात सवलत, अग्निशमन सेवा मोफत द्या; समन्वय समितीची मागणी

मुंबईत गणेशोत्सव मंडळांना पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाडेशुल्कात 50 टक्के सवलत द्यावी आणि अग्निशमन सेवा निःशुल्क द्यावी अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मुंबईतील काही मंडळे जागेअभावी गेल्या 50 वर्षांहून अधिक वर्षे महापालिकेच्या मैदानात मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यासाठी पालिकेकडे 70 ते 75 हजार रुपये शुल्क भरावे लागते. यात दरवर्षी दहा टक्के वाढ केली जाते. त्यामुळे मंडळांना हा आर्थिक भार अडचणीचा ठरतो. त्यामुळे ही सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत समन्वय समितीचे नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

दुजाभाव करू नका!

मुंबईमध्ये साजरा होणाऱ्या रामलीला कार्यक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या पालिकेच्या मैदानाच्या भाड्यात सरकारने सवलत दिली आहे. त्यामुळे दुजाभाव करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.