
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळच्या आर्णी तालुक्यात उमरी कापेश्वर ते झापरवाडी नाल्यावरून शेतकरी परतत असताना नाल्याच्या पुरामध्ये शेतकरी बैलगाडीसह वाहून गेला. बैलगाडीला गाय आणि तिचे वासरू बांधलेले होते. तेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, शेतकरी आणि बैल थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घडना घडली.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतीची कामे आटपून दत्तात्रय समगीर घरी परतत होते. यावेळी मौजा उमरी ( कोपेश्वर ) येथे नाल्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ नको, असे सांगितले. मात्र, दत्तात्रय यांनी बैलगाडी या पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे धाडस त्यांच्या अंगलट आले. पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने बैलगाडी पुरासोबत वाहून गेली. बैलगाडीला बांधलेले गाय आणि वासरुही नदीच्या पुरात वाहून गेले. सुदैवाने दत्तात्रय आणि त्यांच्या बैलांनी नदीचा काठ गाठल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, त्यांची गाय आणि वासरू या नदीच्या पुरात वाहून गेले.
तलाठी यांनी या घटनेचा अहवाल तात्काळ तहसीलदार आर्णी यांना सादर केला आहे. या गायीचा आणि वासराचा शोध गावकरी घेत आहेत. मात्र, ते सापडत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात बैलगाडी नेण्याचे साहस दत्तात्रय यांना महगात पडले आहे.