कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी शहरात पुराचे पाणी शिरले आहे. शेतासह नागरी वस्तीत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे राधानगरी धरणातून विसर्ग सुरूच असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी कोल्हापूरला महापुराचा धोका कायम आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पण राधानगरीतून धरणातून विसर्ग सुरूच आहे. तसेच कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून विसर्ग पुरेसा होत नसल्याने शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदी संगमापासून पाणी अत्यंत संथगतीने वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत चालली आहे. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, महावीर उद्यान, व्हिनस कॉर्नर, लक्षतीर्थ आदी परिसरात पुराचे पाणी वाढू लागल्याने मार्ग बंद करण्यात येत आहेत. तर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला होता. आता काळम्मावाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील 8 हजार 313 पूरग्रस्तांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
राधानगरी धरणातून विसर्ग सुरूच
राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून त्यातून 4284 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यासोबतच पॉवर हाऊसमधूनही 1500 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. एकूण 5784 क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.