लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना बदल अपेक्षित होता. तसा त्यांनी घडवून आणला. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा असून विधानसभेत सत्ता महाविकास आघाडीचीच येणार, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असून या प्रक्रियेला लवकरच मूर्त स्वरूप येईल, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण, रेवडी कल्चर, मराठा आरक्षण आदी विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. विरोधकांच्या एकत्र येण्याने भाजप 240 जागांवरच अडला. लोकसभेप्रमाणेच लोकांना राज्याच्या विधानसभेतही बदल हवा आहे. त्यामुळे सत्ता महाविकास आघाडीचीच येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू असून लवकरच या सर्व प्रक्रियेला मूर्त स्वरूप येणे अपेक्षित आहे, असे पवार म्हणाले.
मोदींनी रेवडी कल्चरवर बोलावे
एक काळ होता, तेव्हा नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या योजनांची ‘रेवडी कल्चर’, म्हणून खिल्ली उडवत होते. आता राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना येत आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होणे चांगले आहे. पण तिजोरीतच काही नसताना असे निर्णय घेतले जात आहेत. हेच निर्णय आधी का घेतले नाहीत, असा सवाल करत शरद पवार यांनी आता मोदींनी रेवडी कल्चरवर बोलावे, असा टोला लगावला. निवडणुकीपुरत्याच या योजना असतील… एखादा हप्ता दिला जाईल… अशी लोकांमध्येच चर्चा आहे, असेही पवार म्हणाले.
तो दिवा आम्ही महाराष्ट्रातील तुरुंगात पाहिला
एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी कायदा मोडला म्हणून गुजरातेतून तडीपार केलेला माणूस आता देशाचा गृहमंत्री असल्याचा टोला लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहा यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे, असे म्हणाले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार यांनी ‘तो दिवा आम्ही महाराष्ट्रातील तुरुंगात पाहिला, असा जबरदस्त टोला लागवला.
आरक्षणाच्या विषयावर एकवाक्यता हवी
मराठा आरक्षणाबाबत मतभेद असण्याचे कारण नाही; पण दोन वर्गामध्ये अंतर वाढतेय की काय अशी काळजी वाटत असून मराठवाड्यातील दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे असे शरद पवार म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारमधील काही लोक बोलतात. मराठा आरक्षणाला विरोध करणारांशी दुसरेच बोलतात. सरकार म्हणून चर्चा होत आहे असे दिसत नाही. मनोज जरांगे, प्रा. लक्ष्मण हाके यांना बोलवा. आमची उपयुक्तता असेल तर आम्हालाही बोलवा. पण या विषयावर एकवाक्यता हवी, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
माझी चूक लक्षात आली…
मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची आठवण सांगितली. विधानसभेत नामांतराचा प्रश्न मांडून आपण त्यावर सभागृहाची संमती घेतली. पण त्याचे उग्र परिणाम मराठवाड्यात झाले. काही गरिबांना त्याची किंमत मोजावी लागली. आपण प्रत्यक्ष मराठवाड्यात न जाता हा निर्णय घेतला ही चूक माझ्या लक्षात आली. त्यानंतर मी स्वत: मराठवाड्यातील प्रत्येक कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर नामांतराला असलेला विरोध मावळला, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांना झटका… बाबाजानी स्वगृही परतले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांबरोबर गेलेले पाथरी येथील विधान परिषदेचे सदस्य बाबाजानी दुर्राणी शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वगृही परतले. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांना सोडून जाणे म्हणजे शून्य होणे. तिकडे गेलेल्यांची अवस्था अशीच आहे. पण मी शून्य होण्यापासून वाचलो, असे यावेळी दुर्रानी म्हणाले.