Ratnagiri News – अवैधरित्या गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश, गुन्हा दाखल

रत्नागिरीत साई हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केंद्र चालवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी साई रूग्णालयात एक डमी पेशंट पाठवून साई हॉस्पिटलच्या डॉ.अनंत नारायण शिगवण यांच्या अवैध कारभाराचा पर्दाफाश केला.

साई हॉस्पिटलचे डॉ. अनंत नारायण शिगवण यांच्याकडे गर्भपातासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय शिक्षण नाही. त्यामुळे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केंद्राला मान्यता नाही. तरीसुद्धा ते अवैधरित्या गर्भपात केंद्र चालवत होते. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना समजली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी स्टिंग ऑपरेशन सुरू केले. साई हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी डमी पेशंट पाठवण्यात आला. साधारण आठवडाभर हे स्टिंग ऑपरेशन सुरू होते. शुक्रवारी रात्री डॉक्टर शिगवण हा अवैधरित्या गर्भपात करत असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तात्काळ साई हॉस्पिटलमध्ये कारवाई केली आणि डॉ. अनंत नारायण शिगवण यांच्या अवैध कारभारा पर्दाफाश केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी कारवाई केली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ.अनंत शिगवण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अनंत शिगवण यांच्यावर आतापर्यंत दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे. एका कारवाईच्या वेळी त्यांना समज देऊन सोडण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी दिली.