>> सत्येंद्र राठी
‘सगीना’, दिलीप कुमार अभिनित या सिनेमाला 15 जुलै रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. ‘सगीना’ची आवर्जून आठवण काढावी, सिनेमाचा असा काही खास लौकिक नाही, पण एक विलक्षण योगायोग घडण्याचे कारण हा सिनेमा ठरला, त्याविषयी…
हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज, एक ‘धीरगंभीर’ नायक दिलीप कुमार, तर एक ‘उछलकूद’ गायक किशोर कुमार. दोघांचे लाखो चाहते. थोड्याफार फरकाने दोघेही समकालीन, पण एका उद्योगात असूनही या दोघांचे एकत्रपणे काम करण्याचे योग हवे तितके आले नाहीत.
तुम्हाला किशोर कुमार यांनी दिलीप कुमारसाठी गायलेले एखादे गाणे तरी आठवते का? आठवले तरी ते गाणे एकच आहे. हो, केवळ एकच! दिलीप कुमार यांच्या संपूर्ण कारकीर्दीत किशोर कुमार यांनी त्यांच्यासाठी केवळ एकच गाणे गायले, पण हे असे का घडले असावे याचा धांडोळा घ्यायचा झाला तर किशोरदांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे जावे लागेल.
किशोरदा चाळीसच्या दशकात मुंबईला आले. ते केवळ अभिनयच नव्हे, तर गाण्याची जाण ठेवून. काहीशा संघर्षानंतर त्यांना अभिनेता म्हणून काम मिळू लागले, पण गायक म्हणून नावाजण्यासाठी त्यांना थोडेथोडके नव्हे, तर वीस वर्षे प्रतीक्षा करावी लागली. असे नाही की, त्यांना गाणी मिळत नव्हती. 50-60 च्या दशकात त्यांची काही गाणी लोकप्रियही झाली, पण त्यांना गायक म्हणून खास प्राधान्य मिळत नव्हते. त्या काळी रफी, मुकेश यांचा दबदबा होता, पण एस.डी. बर्मन, देव आनंद इत्यादींना मात्र किशोर प्रिय. ते त्यांच्यातील प्रतिभा ओळखून होते. किशोर कुमार प्रथितयश नसल्याने उत्तुंग अशा दिलीप कुमारसाठी त्यांचे नाव कोणी आणि का विचारात घ्यावे? पण सत्तरच्या दशकात आलेल्या ‘आराधना’ने सारी परिस्थितीच बदलून टाकली. ‘आराधना’मधील किशोर कुमारनी गायलेली सारी गाणी सुपरहिट ठरली. सिनेसृष्टीला किशोर यांची नव्याने ओळख झाली. संगीतकार आणि अभिनेते त्यांच्या आवाजासाठी आग्रह धरू लागले.
याच वेळी तपन सिन्हा यांनी दिलीप कुमार आणि सायराबानो यांना घेत ‘सगीना’ या सिनेमाची जुळवाजुळव सुरू केली. सिनेमाचे संगीत एस. डी. बर्मनकडे देण्यात आले. किशोरदा हे बर्मन साहेबांचे लाडके. दिलीप कुमारांच्या तोंडी असलेले एक गाणे त्यांनी किशोर कुमार यांना देण्याचे ठरवले. साधारणत: दिलीप साहेबांची गाणी रफी गात. त्यामुळे किशोर यांचा आवाज आपल्याला कितपत लागू पडेल याबाबत खुद्द दिलीपकुमारही साशंक होते. किशोर यांच्या प्रतिभेबद्दल दिलीपकुमारच्या मनात किंतु नव्हते, पण एकदा भेटून ठरवू असे सांगत त्यांनी किशोरदांना भेटण्याचे ठरवले. या भेटीत दोघांनी सिनेमाविषयी चर्चा केली व परत भेटू असे नक्की केले.
हेतू इतकाच की, प्रत्येक भेटीत किशोर कुमार यांनी दिलीप कुमार यांच्या अभिनय शैलीतील बारकावे समजून घ्यावेत आणि त्या अनुषंगाने त्याचा उपयोग करावा. दिलीप कुमारांची इच्छा होती की, त्यांचा अभिनय किशोर यांच्या कंठातून प्रकट व्हावा आणि किशोर यांचा आलाप त्यांच्या भूमिकेतून. अशाने स्वर आणि अभिनयामध्ये तादात्म्य साधले जाणार होते. दोघेही आपल्या प्रस्तुतीकरणाबद्दल काटेकोर असल्याने ठरल्याप्रमाणे त्यांच्या भेटी होत गेल्या.
शेवटी रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला. किशोरदांनी रेकॉर्डिंगमध्ये धमाल उडवून दिली. ‘सगीना’मधील ‘साला मैं तो साहब बन गया, साहब बनके कैसा तन गया’ हे गाणे त्यांनी असे काही गायले की, लोकांना रफीची पोकळी जाणवलीच नाही. दिलीप कुमार कमालीचे खुश झाले. गाणे सुपरहिट ठरले. किशोर आणि दिलीप कुमार यांचे रसायन जमून येईल का? ही अनामिक भीती या गाण्याने खोटी ठरवली, पण असा योग पुन्हा आला नाही. वाढत्या वयाचे कारण होत दिलीप कुमार नायक म्हणून काहीसे बाजूला पडले आणि काही वर्षांत किशोरदा पण जग सोडून निघून गेले. त्यामुळे या दोघांना एकत्र आणत मनोरंजनाची लयलूट करणे रसिकांच्या नशिबी आले नाही. केवळ एका गाण्यात समाधान मानावे लागले.