Ratnagiri News – रत्नागिरी जिल्हा बँकेकडून 30 टक्के लाभांश जाहीर, तीन हजार सभासदांना मिळणार लाभ

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना 30 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. एकप्रकारे सहकार क्षेत्रातील हा विक्रमच समजला जात आहे. सभासदांना 30 टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात लाभांश वाटप करणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिलीच बँक ठरली, अशी माहिती अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. सुमारे तीन हजार सभासदांना हा लाभ मिळणार आहे.

थिबापॅलेस येथील जयेश मंगल कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, सहव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर, उपसरव्यवस्थापक श्री. अजित नाचणकर, श्री. राजन होतेकर, श्री. श्रीकृष्ण खेडेकर, रमेश कीर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने नफा वाटणीत 30 टक्के लाभांश सभासदांना देण्याची शिफारस केली होती. या शिफारशीला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटासह मंजुरी दिली. जिल्हा बँकेमार्फत गेली अनेक वर्षे सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात आला. गतवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आश्वासित केल्याप्रमाणे यावर्षी सभासदांनी 30 टक्के लाभांश देण्याचे आश्वासन पूर्ण केले. त्यामुळे डॉ. चोरगे यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यासाठी गेले वर्षभर बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेऊन बँकेने 4600 कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केला. यावर्षी बँकेने चांगला नफा मिळवून नाबार्ड, आरबीआयच्या सर्व तरतुदींचे पालन करून सभासदांना 30 टक्के लाभांश दिला असून संचालक मंडळाला याचा अभिमान आहे. 25 टक्के लाभांश, 5 टक्के शेअर्स सभासदांना देण्यात आले आहे.