महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा इशारा; पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत दोन-तीन दिवसांपूर्वी तुफान पाऊस झाला. सलग तीन ते चार दिवस पडणाऱ्या पावसाने राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशावर सक्रिय आहे. हे क्षेत्र पुढील 24 तासांत वायव्येकडे सरकत आहे. तर पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळदरम्यान समुद्रसपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यत आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी ट्विटमध्ये 27 जुलै ते 30 जुलै या चार दिवसांचा हवामान अंदाज नकाशातून दर्शवला आहे.

पुण्याला पुन्हा अतिृष्टीचा इशारा!

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ढगाळ हवामान राहील. तसेच पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष करून घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे.