
नवी मुंबईतील बेलापूर जवळील शाहबाज गावातील ‘इंदिरा निवास’ नावाची तीन मजली इमारत शनिवारी पहाटे कोसळली. याची माहिती मिळताच पोलीस, एनएमएमसीचे अग्निशमन दल, प्रशासनाचे अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 64 वर्षांचा पुरूष आणि 45 वर्षांची महिला अडकली होती. त्या दोघांनाही बाहेर काढण्यात आले असून उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सदर इमारतीमध्ये 13 प्लॅट आणि 4 गाळे होते. या इमारतीमध्ये जवळपास 52 लोकं रहात होते. या रहिवाशांच्या मदतीसाठी रिक्षावाला आणि सलूनवाला देवदूत बनून धावले. त्यांनी जवळपास 49 जणांना मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.
शुक्रवारी रात्री इमारत एका बाजूला कललेली दिसताच एक रिक्षावाला आणि सलूनवाला धावत आले. त्यांनी सर्व रहिवाशांना उठवून इमारतीबाहेर काढले, म्हणून मोठी जीवितहानी टलली. मात्र दोघे जण इमारतीच्या बाहेर पडू शकले नाहीत. त्यानंतर इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि आतील दोघे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मात्र बचाव पथकाने त्यांना बाहेर काढले असून आणखी एक व्यक्ती ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा शोध सुरू आहे.
View this post on Instagram
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, आज पहाटे पाचच्या सुमारास ही इमारत कोसळली. बेलापूर वॉर्डातील शाहबाज गावातील सेक्टर-19 मध्ये ही जी+3 इमारत होती. या इमारतीमध्ये जवळपास 13 फ्लॅट आणि चार गाळे होते. यात 52 च्या आसपास लोकं राहत होते.
ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोघांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी दोघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि एनएमएमसीचे बचाव पथक ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कार्य करत आहे. तसेच ही इमारत जवळपास 10 वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. 10 वर्षातच इमारत जीर्ण होऊ कशी कोसळली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.