प्लेलिस्ट – गिटारवरील रागदारी

>> हर्षवर्धन दातार

गिटारचा उपयोग काही वेगळे परिणाम साधण्याकरितासुद्धा करण्यात आला. काही प्रख्यात गिटार वादकांनी चित्रपट आणि सुगम संगीताव्यतिरिक्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात, वेस्टर्न क्लासिकल, पॉप, जॅझ यात गिटारचे प्रयोग केले. अशाच काही दिग्गज गिटार वादकांनी केलेल्या अभिनव प्रयोगांविषयी.

आपल्या चित्रपट संगीतात गाणी आणि त्याअनुषंगाने वाद्यवृंदाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यातही व्हायोलिन, गिटार, बासरी ही वाद्यं सर्वसमावेशक असल्यामुळे जवळ जवळ प्रत्येक गाण्यात हजेरी लावतात. काही प्रख्यात गिटार वादकांनी चित्रपट आणि सुगम संगीताव्यतिरिक्त हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतात, वेस्टर्न क्लासिकल, पॉप, जॅझ यात प्रयोग केले. गिटारचा उपयोग काही वेगळे परिणाम साधण्याकरितासुद्धा केला आहे.

आधीच्या प्रथितयश गिटार वादकांत चरणजित सिंग, व्हॅन शिपले यांनी असे बरेच प्रयोग केले. 1982 साली ‘सिंथेसाइझिंग टेन रागास टू डिस्को बीट’ या अल्बमच्या माध्यमातून चरणजित सिंग यांनी डिस्को या त्या काळात नाझिया हसन आणि बिद्दू या पाकिस्तानी बंधू-भगिनींनी लोकप्रिय केलेल्या नृत्य-संगीताचे हिंदुस्थानी संगीतातील रागदारीशी फ्यूजन साधण्याचा प्रयत्न केला. गिटार म्हटलं की, आपल्या नजरेसमोर पाश्चात्त्य संगीत येतं. मात्र आपल्या अनेक वादकांनीसुद्धा या वाद्यावर हुकूमत मिळवली. व्हॅन शिपले हे पहिले इलेक्ट्रिक गिटारिस्ट. तबला, व्हायोलिन, गिटार अशी अनेक वाद्यं वाजवण्यात तरबेज असलेल्या शिपले यांनी आकाशवाणीवर काम केलं. हुस्नलाल भगतराम यांचे सहायक, खेमचंद प्रकाश, अनिल बिस्वास, गुलाम हैदर यांच्यासह अनेक संगीतकारांच्या 1500 संगीत रचनांमध्ये वादन, फ्यूजनचे प्रयोग, गिटारवर जोगिया आणि यमन कल्याण जुगलबंदी ही त्यांची यशस्वी कारकीर्द. गिटार आणि व्हायोलिनवर शास्त्राrय, पाश्चात्त्य, पॉप आणि जॅझ… सर्व प्रकारचे संगीत वाजवण्याचे कौशल्य व्हॅन शिपले यांच्याकडे होते.

गिटारमध्ये तारा जोडून त्याचा वापर शास्त्राrय संगीतात रागदारीत करण्याचे श्रेय प्रामुख्याने पंडित ब्रिजभूषण काब्रा यांना जाते. सरोद विशारद अली अकबर खानकडे काही काळ त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे घेतले. ‘कॉल ऑफ व्हॅली’ (1967) सालच्या या अल्बममध्ये शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर वादन करून त्यांनी हे वाद्य लोकांसमोर आणले. त्यांनी हवाईयन गिटारवर रागदारीसुद्धा वाजवली. सोलो शोजबरोबर ते अनेक वर्षं होतकरू विद्यार्थ्यांना गिटार शिकवण्याचं महान कार्यही करत होते.

स्टील प्लेट आणि त्यावर तारा बसवून त्या वाजवल्याने आवाज घुमतो, त्याला कंपन प्राप्त होते. अशा प्रकारच्या गिटारवर पाश्चात्त्य हार्मनीज किंवा ब्लूज टय़ून्स वाजतात. गिटारला फ्लॅजर, सायकलीला असते तसे पेडल असे अनोखे प्रयोग करून आवाजात विविधता आणली गेली.

‘किताब’ (1977) या चित्रपटात इंजिन ड्रायव्हर चरित्र अभिनेता राम-मोहन यावर चित्रीत आगगाडीचं एक गाणं आहे ‘धन्नो की आंखो मे’. यात सुरुवातीला आणि गाण्याच्या मध्ये बेसूर वाटणारे सूर वाजतात. कल्पक संगीतकार राहुल देव बर्मन यांची ती भन्नाट करामत होती. आवाज या कल्पनेशी पंचमदांचं एक वेगळंच नातं होतं. नवीन आवाजाचा गाण्यात योग्य वापर करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी अमेरिकेहून ‘फ्लॅन्जर’ नावाचं उपकरण आणलं होतं. कुठल्याही वाद्याला ते जोडून मूळ सुरुवातीचा वेग कमी जास्त करून एक वेगळी हार्मनी तयार होते. हाच प्रयोग त्यांनी ‘रॉकी’ (1981)- ‘हम तुमसे मिले’, ‘कुदरत’ (1981)- ‘हमे तुमसे प्यार कितना’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’च्या (1980) शीर्षक संगीतात केला. यातूनच लक्ष्मीकांत-प्यारेलालनी ‘रुक जाना नाही’- ‘इम्तिहान’मध्ये (1974) किंवा दान सिंग यांनी ‘वो तेरे प्यार का गम’- (‘माय लव्ह’) (1970) यात गिटार-सॅक्सोफोनच्या कमी जास्त आवाजातून तो गहिरेपणा उत्कृष्ट साधला आहे, ते दुःख श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत. शंकर-एहसान-लॉय यांचे गिटारिस्ट एहसान कुरेशी यांनी हाच डीले इफेक्टचा परिणाम ‘दिल चाहता है’ (2001) यातील ‘कैसी है ये रूत के जिसमे’मध्ये आणला आहे. इको (प्रतिध्वनी) ‘कोरा कागज था’ – ‘आराधना’ (1969) आणि घुमणारा आवाज ‘आज कल जिंदगी’- ‘वेकअप सिड’ (2000) हे परिणाम गिटारच्या वैविध्यपूर्ण वापरातून साधले आहेत. प्रयोगशील पंचमनी ‘प्यार करनेवाले’ – ‘शान’मध्ये (1980) रिदम गिटार अनेक प्रकारात वापरून नावीन्य आणले.
पार्श्वसंगीतात गिटारचा वापर – ‘दिल चाहता है’, गाण्याची सुरुवात गिटारच्या विलंबित सुरावटीतून- ‘तू है वही’ (‘ये वादा रहा’) किंवा ‘ये चांद सा रोशन चेहेरा’, ‘काश्मीर की कली’ (1964), इंटरल्यूडमध्ये ‘मेरा जीवन कोरा कागज’, दुःखी प्रसंगात ‘ ओ साथी रे’ – ‘मुकद्दर का सिकंदर’ (1978), स्पर्धा (कॉम्पेटिशन) गाणी शृंखला – ‘हम किसीसे कम नही’ (1977), विनोदी प्रसंगात – ‘अरे रफ्ता रफ्ता देखो’ – ‘कहानी किस्मत की’ (1973) हे वेगवेगळे इफेक्ट्स आणि सॅक्सोफोन, मेंडोलीन, बासरी किंवा व्हायोलिन्स या इतर वाद्यांच्या साथीने वैविध्यपूर्ण गिटारच्या वादनाने साधता येते ही या हरहुन्नरी वाद्याची विशेषता.

‘उपरवाला जानकर’ – ‘काला बाजार’ (1960) यात गिटार-मेंडोलीनमधून आणि ‘होगा तुमसे प्यारा कौन’ – ‘जमाने को दिखाना है’मध्ये (1982) गिटार-पॉलिश पेपर यातून रेल्वे इफेक्ट साधला आहे, तर ‘माझ्या सारंगा’ या शांता शेळके-लता-हृदयनाथ यांच्या तुफान कोळीगीतात खवळलेल्या समुद्राचा परिणाम अकोस्टिक गिटारमधून ऐकू येतो. ‘अमर प्रेम’ (1970) यात ‘चिंगारी कोई भडके’ गाण्यात हुगळी नदीचे पाणी कापीत चाललेल्या नावेचा आभास भूपिंदरसिंग यांच्या गिटारमधून जाणवतो.

अनेक प्रकार, त्यातील बारकावे, प्रयोगशीलतेतून त्यात केलेले बदल, वैविध्यपूर्ण वापर यामुळे गिटार हे सगळ्या संगीत प्रकारात एक सर्वसमावेशक आनंद देणारे वाद्य म्हणून वावरले आहे.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)