आठवडाभर धरण क्षेत्रासह जिह्यात झालेल्या सर्वत्र तुफान पावसाने आता कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यामुळे गुरुवारपासून आतापर्यंत धरणाचा क्रमांक दोनचा दरवाजा वगळता उर्वरित सहा दरवाजे उघडले असून त्यामधून 10 हजार 68 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी आणि तुळशी धरणातून विसर्ग वाढल्याने भोगावतीसह पंचगंगा व अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 95 बंधारे पाण्याखाली गेले असून 11 राज्य, 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे 80हून अधिक मार्ग बंद झाले आहेत, तर अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे.
पूरग्रस्तांचे स्थलांतर; पाऊण कोटींचे नुकसान
पुराचे पाणी शिरलेल्या गावांतील ग्रामस्थांच्या स्थलांतराची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत 653 जणांचे, तर 105 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच कोल्हापूर शहरातील 21 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांच्या तुकडीकडून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास वारंवार आवाहन करणे सुरूच आहे.