दिल्लीत उद्या म्हणजे शनिवारी 27 जुलै 2024 ला नीती आयोगाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मात्र, नीती आयोगाच्या या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. नीती आयोग बरखास्त करा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
नीती आयोग बरखास्त करा आणि नियोजन आयोग पुन्हा आणा. नियोजन आयोग हा नेताजी बोस यांची कल्पना होती, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रातील एनडीए सरकारवर हल्ला चढवला आहे. आपसातील भांडणामुळे केंद्रातील एनडीए सरकार कोसळेल, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
हे सरकार आपसातील लढाईतून कोसळेल, थोडी वाट बघा. या दौऱ्यात आपल्याला फार वेळ नसल्याने कुठल्याही नेत्याची भेट ठरलेली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीची भेट घेण्याचा माझा विचार आहे. त्यांच्याशी मी बोलेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.