वाघोलीतील ज्वेलर्स दुकान फोडणारे जेरबंद; सराईतावर तब्बल 25 गुन्हे दाखल

पुण्यातील वाघोली परिसरात असलेल्या गणेश ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकाटून घरफोडी करणार्‍या सराईत आरोपीसह दोघांना गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी, घरफोडीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हंसराज उर्फ हंसु रणजितसिंग टाक (20), सनिसिंग जितेंद्रसिंग जुनी (22, रा. दोघेही, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील हंसराज टाक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, घरफोडीचे तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वाघोलीतील गणेश ज्वेलर्स येथे 15 जुलै रोजी घरफोडीची घटना घडली होती. तेव्हापासून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. गुन्हे शाखा यूनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर असतानाच गुन्ह्यातील संशयीत आरोपी वाघोली ते भावडी रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती पोलीस नाईक नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून टाक आणि जूनी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडील दोन दुचाकी या चोरीच्या असल्याचे समोर आले. तसेच, आरोपींनी 15 जुलै रोजी साथीदारांसह वाघोलीतील गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटून घरफोडी केल्याची कबूली दिली.

पोलिसांनी दोघांना अटक करून लोणीकंद, येरवडा, देहूरोड पोलीस ठाण्यातील एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, यूनिट सहाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रुषीकेश ताकवणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.