जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव, जोडतलाव ओव्हर फ्लो; पहिल्यांदाच जुलै महिन्यातच भरला

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव आणि भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे जामखेड शहर व पाच वाड्यावस्त्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील तीन वर्षापासून तलाव ओव्हर फ्लो होतो. मात्र, त्याठी सप्टेंबर महिन्याची वाट बघवी लागतेय यंदा प्रथमच जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे जामखेड शहराचा पाणीप्रश्न मिटला आहे.

जुलै महिन्यात जामखेड शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जामखेड तालुक्यातील मोहरी व जामखेड शहरातील धोत्री व रत्नापूर तलाव यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत. भुतवडा तलाव ओव्हर फ्लो झाला, तरी जामखेड शहराला पाणीपुरवठा आठ दिवसाआड होत आहे. जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव गुरुवारी पूर्ण क्षमतेने भरला असून ओव्हर फ्लो झाला आहे. भुतवडा तलाव 119 दशलक्ष घनफूट व भुतवडा जोडतलाव 48 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. या तलावातून 42 दशलक्ष घनफूट पाणी जामखेड नगरपरिषदेला पाटबंधारे विभागाकडून वर्षभरासाठी दिले जातो. जामखेड शहर व पाच वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून (दहीगाव) येथून होणारा पाणीपुरवठ्याचे काम प्रगतीपथावर असून 40 टक्के झाले आहे.

जामखेड शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता 45 वर्षांपूर्वी जुन्या पाईपलाईनमधून भुतवडा तलावातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट पाणीपुरवठा 24 तास चालू होता. शहराचा विस्तार वाढल्याने प्रत्येक भागात पाणी पोहचण्यासाठी विलंब होत आहे. परिणामी आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. या तलावावर 150 हेक्टर क्षेत्रातील शेतीसाठी पाणी दिले जाते. त्यामुळे हा तलाव भरल्याने जामखेड शहरातील नागरिक आणिशेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.