पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेनेत ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रवेश केला. या पाठोपाठ माजी खासदार शिशुपाल पटले यांनी विदर्भात भाजपला दुसरा धक्का दिला. शिशुपाल पटले यांनी भाजपचा राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी 24 जुलैला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. यामुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला भंडारा-गोंदिया जिल्ह्यात गळती सुरू झाली आहे.
विदर्भात भाजपला एकाच दिवशी दोन धक्के; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, तर माजी खासदाराचा राजीनामा
शिशुपाल पटले यांनी 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठीही मोठे धक्का मानला जातो.
पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही – पटले
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे, पाठपुरावा करीत होतो. मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे. शिशुपाल पटले यांनी नाव न घेता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची नाराजी वाढत चालल्याचे दिसते आहे.