Kolhapur Flood : 95 बंधारे पाण्याखाली; नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरले, शाळा-कॉलेजला सुट्टी

आठवडाभर धरणक्षेत्रा सह जिल्ह्यात झालेल्या सर्वत्र तुफान पावसाने आता कोल्हापूरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे पाच च्या सुमारास राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यामुळे कालपासून आतापर्यंत धरणाचे क्रमांक दोनचा वगळता उर्वरित सहा दरवाजे उघडले असून त्यामधुन 10 हजार 68 क्युसेक विसर्ग सुरू आहे.काळम्मावाडी आणि तुळशी धरणातून विसर्ग वाढल्याने भोगावतीसह पंचगंगा व अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 95 बंधारे पाण्याखाली गेले असून 11 राज्य, 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे 80 हून अधिक मार्ग बंद झाले आहेत. तर अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे.

दरम्यान, आज संततधार पावसासह शहरासह काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे 43 फुटाच्या धोका पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगेची पाणी पातळी सकाळी अकराच्या सुमारास 45 फूट झाली होती. तर गुरुवारी रात्री अकरा पासूनच शहरातील शाहूपुरी, लक्षतीर्थसह सखल भागात नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरू लागल्याने पूरग्रस्तांची सुरक्षित स्थळी स्थलांतरा -साठी धांदल उडाली होती. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने दोन दिवस शाळा-काॅलेजला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरण अजुनही शंभर टक्के भरले असून, धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 1, 3, 4, 5, 6 व 7 असे एकूण 6 दरवाजे खुले असून धरणातून 10 हजार 68 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता.पावसाचा जोर पाहता क्रमांक दोनचा स्वयंचलित दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता असल्याने, त्यातुनही होणा-या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शाहूपुरीत कुंभार गल्ली येथे पुराचे पाणी शिरल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.येथील नागरिकांना स्थलांतर होण्याचे आवाहन करत गणेश मूर्ती इतरत्र हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.येथील नागरिकांनी रात्रीच स्थलांतराला सुरुवात केली आहे.घरगुती साहित्यही इतरत्र हलविण्यात येत आहे.

95 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी व घुंगुरवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली व असळज, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे, पानोरे, म्हसुर्ली व शेळोशी वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड व तुरुंबे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी, हजगोळी, भादवण, गजरगाव व गिजवणे. घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी. चित्री नदीवरील परोली असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.

पूरग्रस्तांचे स्थलांतर; पाऊण कोटींचे नुकसान

नदीकाठावर तसेच सखल भागात पुराचे पाणी शिरलेल्या गावांतील ग्रामस्थांचे प्रशासनाकडून स्थलांतराची कार्यवाही सुरू आहे. आतार्यंत 653 जणांचे, तर 105 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच कोल्हापूर शहरातील 21 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.एनडीआरएफ च्या जवानांच्या तुकडी कडून पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास वारंवार आवाहन करणे सुरुच होते. दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील 133 मातीची कच्ची घरे, 23 पक्की घरे व 10 जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली असून,सुमारे 73 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारीची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाली होती.

धरणातील पाणीसाठा

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा टिएमसीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.राधानगरी 8.36, तुळशी 3.13, वारणा 30.52, दूधगंगा 20.39, कासारी 2.21, कडवी 2.52, कुंभी 2.12, पाटगाव 3.50, चिकोत्रा 1.08, चित्री 1.89, जंगमहट्टी 1.22, घटप्रभा 1.56, जांबरे 0.82, आंबेआहोळ 1.24, सर्फनाला 0.48 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 22 राज्यमार्ग व 37 जिल्हा प्रमुख मार्ग बंद

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 11 राज्य मार्ग व 37 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 48 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे.ग्रामीण व इतर मार्ग असे 80 हून अधिक मार्ग बंद झाल्याचे चित्र आहे.