
संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी म्हणून 10 वर्षांची मुलगी घराबाहेर पडली. खेळण्याच्या नादात गल्लीबोळात ती भरकटली आणि दिसेल त्या रस्त्याने चालत गेली. घरचा परिसर सोडून ती भोईवाडा नाक्यावर आली आणि रडत उभी राहिली. भोईवाडा पोलिसांच्या ती नजरेस पडली आणि तिची सुखरुप घरवापसी झाली.
भोईवाडा पोलिसांचे पथक गस्त घालत असताना गुरुवारी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 10 वर्षांची मुलगी त्यांना रडत उभी असलेली दिसली. ती एकटीच असल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे, उपनिरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे सहाय्यक फौजदार मोहिते, तसेच अंमलदार मंजुषा वानखेडे यांनी त्या मुलीला सोबत घेऊन भाईवाडा हद्दीत तिच्या घरचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू शारिरीक व्याधीमुळे मुलीला फारसे बोलता येत नव्हते.
विचारलेल्या प्रश्नांना तिला व्यवस्थित उतर देता येत नव्हते. त्यामुळे तिचे घर शोधणे कठीण बनले होते. पण पथकाने हार मानली नाही. गोडीगुलाबीने, मायेने गप्पा मारत तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कबरस्तानच्या मागे असे ती बोलली. मग वडाळा असं बोलल्यावर पोलिसांनी अॅण्टाप हिल पर्यंत शोध घेतला. पण काहीच फायदा झाला नाही.
पथकाच्या ड्युटीची वेळ संपली पण काही केल्या मुलीच्या पालकांचा शोध घ्यायचाच असे ठरवून त्यांनी शोध सुरू ठेवला. बोलता बोलता माझे आई वडील जरी काम करतात असे मुलीने सांगितले. त्यामुळे पोलीस तिला चार रस्ता येथील नॅशनल मार्केट परिसरात घेऊन गेले. तेथे गेल्यावर आपल्या घराची गल्ली दिसताच मुलीने धुम ठोकली.
मग पोलिसांनी तिच्या मागे जात तिचे घर गाठले. त्यानंतर पालकांसह तिला पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. समाजकंटकाच्या नजरेस पडण्याआधी मुलगी पोलिसांना दिसल्याने तिची सुखरूप घरी वापसी केली.