
गेल्या तीन आठवड्यापासून गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा अक्षरश: कहर सुरू आहे. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मृतांचा आकडाही चिंताजनक आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
सुरतमध्ये चांदीपुरा व्हायरसची लागण झालेला पहिला संशयित रुग्ण आढळला होता. झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला खूप ताप आणि उलट्या होत असल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर राजकोट, सांबरकांठासह विविध जिल्ह्यात 124 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 54 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून 26 जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये आढळलेला हा व्हायरस आता शहरी भागातही वेगाने पसरू लागला आहे. आतापर्यंत पंचमहालमध्ये 15, साबरकांठामध्ये 12, अहमदाबादमध्ये 12, मेहसाणामध्ये 7, अरवल्ली, वडोदरा, जामनगरमध्ये प्रत्येकी 6, बनासकांठा, मोरबी, आणि राजकोटमध्ये प्रत्येकी 5, सुरेंद्रनगरमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत. यासह नर्मदा, दाहोद, कच्छ, सूरत, भरूच, देवभूमी द्वारका, छोदा उदेपूर, गांधीनगर येथेही या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. गुजरात व्यतिरिक्त राजस्थानमध्येही या व्हायरसची लागण झालेले 6 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 5 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच मध्य प्रदेशमध्ये 2 आणि महाराष्ट्रातही 1 रुग्ण आढळला आहे.
काय आहे हा विषाणू?
1966 मध्ये महाराष्ट्रात या व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळल्याचे मानले जाते. नागपूरमधील चांदीपूर भागात पहिला संशयित रुग्ण आढळल्याने याचे नाव चांदीपुरा व्हायरस पडले. यानंतर 2004, 2006 आणि 2019मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा व्हायरस आढळला होता. हा एक आरएनए व्हायरस असून मादी फ्लेबोटोमाइन माशीमुळे पसरतो.
काय आहेत लक्षणे?
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे खूप काही वेगळी नाहीत. मात्र रुग्णाला सतत ताप येतो. ताप आणि एन्सेफलायटीसची लक्षणे रुग्णात दिसतात. एन्सेफलायटीस हा एक गंभीर आजार असून ज्यामुळे मेंदूला सूज येते. चांदीपुरा व्हायरसवर कोणतीही लक्ष उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार वेळीच लक्षात येणे आवश्यक आहे.