अखेर नगमा उर्फ सनमला अटक; पाकिस्तानच्या वशीरसोबत ऑनलाइन निकाह

गेल्या चार दिवसांपासून चर्चेत – असलेली नगमा मकसूदअली उर्फ सनम खानला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीने बोगस पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ती पाकिस्तानवरून परतल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी तिला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानवरून 21 जुलै रोजी परत आल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सनम व तिच्या आईची चार दिवस कसून चौकशी केली. चौकशी पूर्ण होताच गुरुवारी पोलिसांनी तिला अटक करून ठाणे जिल्हा न्यायालयात हजर केले. तिने स्वतःचा व मुलीचा पासपोर्ट बनवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पुढील तपास करण्यासाठी न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.