
मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचा जोर वाढल्याने आणि हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शुक्रवारीही सुट्टी मिळेल अशी शक्यता होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने शाळा आणि महाविद्यालये आज नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.
मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे. ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये शुक्रवार, दिनांक 26 जुलै 2024 रोजी नियमितपणे सुरू राहतील, असे ट्विट बीएमसीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून केले आहे.
कृपया, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे. अधिक माहितीसाठी शाळा व महाविद्यालये व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.
ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी नियमितपणे सुरू राहतील.
कृपया, बृहन्मुंबई…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2024
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे, कोल्हापूर, विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात हवामान विभागाने शुक्रवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.