Paris Olympics 2024 – हिंदुस्थान महिला तिरंदाज उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील अभियानास आजपासून (दि.25) प्रारंभ झाला. हिंदुस्थानी महिला तिरंदाजांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक देत या क्रीडा महोत्सवाची धडाकेबाज सुरुवात केली. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर या हिंदुस्थानी संघाने 1983 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानी झेप घेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.

हिंदुस्थानी संघाने तिरंदाजीच्या रिकर्व प्रकारातील पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. यामध्ये अंकिता भगत हिने सर्वोत्तम कामगिरी केली. तिने 72 शॉटमध्ये हिंदुस्थानसाठी सर्वाधिक 666 अंक मिळवले. ती पात्रता फेरीत अकराव्या स्थानी राहिली, मात्र स्टार तिरंदाज दीपिका कुमारी आणि भजन कौर यांना टॉप-20 मध्ये स्थान मिळविता आले नाही. भजन कौर 659 गुणांसह 22 व्या, तर दीपिका पुमारी 658 गुणांसह 23 व्या स्थानावर राहिली. अंकिता भगतने दुसऱ्या हाफच्या शेवटच्या 2 सेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. 18 वर्षीय भजन कौरला अखेरच्या फेरीत दमदार कामगिरी करता आली नाही.

आता दीपिका कुमारीकडून अपेक्षा
हिंदुस्थानच्या महिला तिरंदाजी संघातील स्टार खेळाडू दीपिका कुमारी हिच्याकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र ती गुरुवारी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकली नाही. मात्र हिंदुस्थानी महिला संघाला पदक जिंकण्यासाठी आता दीपिका कुमारीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

नव्या विक्रमासह दक्षिण कोरिया अव्वल स्थानी
ऑलिम्पिकमधील तिरंदाजीच्या नियमानुसार पहिले चार संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतात. हिंदुस्थानी संघाने अखेरच्या चौथ्या स्थानी राहत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्क केलं. दक्षिण कोरियाच्या संघाने नव्या विक्रमासह सर्वाधिक 2046 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकाविले. चीनने 1996 गुणांसह दुसरे, तर मेक्सिकोने 1986 गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. कोरियाच्या लिम सिहयिओन हिने 694 गुणांसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तिचीच संघ सहकारी सुहियोन नाम ही 688 गुणांसह दुसऱया, तर चीनची यांग जियाओलेई 673 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. हिंदुस्थानची आगामी लढत फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यातील विजयी संघासोबत होईल. 5 ते 12 व्या क्रमांकावर असणाऱया संघांना राऊंड ऑफ 16 मधून आगेकूच करावी लागणार आहे.

पुरुष तिरंदाजांचेही महिलांच्या पावलावर पाऊल!
हिंदुस्थानी महिला तिरंदाजी संघाच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुस्थानच्या पुरुष संघानेही पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मराठमोळा प्रवीण जाधव, अनुभवी तरुणदीप रॉय व धीरज बोम्मादेवरा या हिंदुस्थानी त्रिपुटाने 2013 गुणांची कमाई करीत तिसरे स्थान मिळवित आगेपूच केली. हिंदुस्थानच्या पुरुष संघाने तिरंदाजीच्या रिकर्व प्रकारातील पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळविल्याने आता अंतिम फेरीपर्यंत त्याला तगडय़ा दक्षिण कोरियाचा सामना करावा लागणार नाही. धीरजने 681 गुणांची कमाई करीत चौथे स्थान मिळविले. अनुभवी तरुणदीप राय 674 गुणांसह 14 व्या स्थानावर राहिला, तर प्रवीण जाधव हा 658 गुणांसह 39 व्या स्थानी राहिला. कोरिया सर्वाधिक 2049 गुणांची कमाई करीत अव्वल, तर फ्रान्सने 2025 गुणांसह दुसरे स्थान मिळविले.