>>मंगेश वरवडेकर
अवघ्या जगाला एका मंचावर आणणाऱया क्रीडा सोहळय़ासाठी जगभरातून आलेले तब्बल 10,500 पेक्षा अधिक क्रीडापटू आणि लाखो क्रीडाप्रेमी सेन नदीकिनारी आज सज्ज झाले आहेत. तिसऱयांदा ऑलिम्पिकचे आयोजन करणारे पॅरिस प्रथमच स्टेडियमच्या भिंती ओलांडून सेन नदीच्या किनारी हा अनोखा सोहळा आयोजित करतेय. शतकाच्या प्रतीक्षेनंतर पॅरिसच्या क्रीडाभूमीवर 32 खेळातील 329 सुवर्ण पदकांसाठी 206 देशातील क्रीडावीर ध्वज विजयाचा उंच धरण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.
हिंदुस्थानचा दस का दम
हिंदुस्थानने टोकियोतील सप्तपदकांच्या कामगिरीला मागे टाकण्याचे ध्येय यंदा बाळगले आहे. गेल्या तीन वर्षांत हिंदुस्थानी खेळाडूंनी जागतिक पातळीवर मिळवलेले यश पॅरिसमध्ये नवा इतिहास रचेल, असा विश्वास पदोपदी व्यक्त केला जात आहे. आजवर हिंदुस्थानने कधीही दोन सुवर्ण जिंकलेले नाहीत, मात्र यावेळी हिंदुस्थानी अॅथलीट ‘उम्मीद से दुगना’ कामगिरी करण्यासाठी लढणार आहे. नीरज चोप्राच नव्हे तर बॅडमिंटन, नेमबाजी आणि पुस्तीत हिंदुस्थानी खेळाडू सोनेरी इतिहास रचतील, असा अंदाज आहे. हिंदुस्थानचे 117 खेळाडू अॅथलेटिक्स, नेमबाजी, हॉकी, तिरंदाजी, मुष्टियुद्ध, जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, नौकानयन, गोल्फ अशा खेळांमध्ये दिमाखदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे टोकियोत जिंकलेल्या सात पदकांचा अंक निश्चितच दहाच्या पुढे असेल.
सेन नदीवरून रंगीबेरंगी परेड
टोकियो ऑलिम्पिकच्या संघर्षमय स्पर्धेनंतर पुन्हा एकदा क्रीडापटू पॅरिस गाजवण्यासाठी उतरतील. कोरोनाच्या संकटामुळे टोकिया ऑलिम्पिकला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. तरीही जपानने स्पर्धेचे आयोजन करत आपली ताकद जगाला दाखवून दिली होती. फ्रान्सच्या ऑलिम्पिक आयोजन समितीने उद्घाटन सोहळा नयनरम्य करताना सेन नदीवरून 10,500 खेळाडूंची परेड काढण्याचे ठरवले आहे. ऑस्टरलीट्झ ब्रिजपासून सुरू होणारी ही परेड आयफेल टॉवरपर्यंतचा आपला प्रवास करील. यादरम्यान पॅरिसची संस्पृती आणि वास्तुकलेचे दर्शन अवघ्या जगाला होईल. ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियमच्या बाहेर उद्घाटन सोहळा आयोजित केला जात आहे. हा सोहळासुद्धा काही कारणास्तव वादात सापडला होता, मात्र आयोजकांनी आणि सरकारने हा विरोध मोडीत काढला आहे. त्यामुळे प्रचंड बंदोबस्तात तब्बल 100 बोटींसह सेन नदीवर हजारो कलाकारांच्या अदाकारीने हा संस्मरणीय पार पाडला जाईल.
अमेरिका, चीनमध्ये कांटे की टक्कर
गेल्या चार स्पर्धांपासून अव्वल स्थानासाठी अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेली कांटे की टक्कर पॅरिसमध्येही असेल. टोकियोत अमेरिकेपेक्षा चीनला अवघा एक सुवर्ण कमी मिळाला होता, मात्र पदक तालिकेत शतक गाठणारा अमेरिका एकटाच होता. अमेरिकेने 39 सुवर्णांसह 113 पदके जिंकली होती तर चीनने 38 सुवर्णांसह 89 पदकांची कमाई केली होती. गेल्या तीन वर्षांत चीनने अमेरिकेला मागे टाकण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसत असले तरी अमेरिकन खेळाडूही आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी सज्ज झालेत. त्यामुळे दोघांमध्ये असलेला संघर्ष आणखी तीव्र होणार, यात तीळमात्र शंका नाही.
हॅटट्रिकवर सिंधूची नजर
हिंदुस्थानी स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आपल्या तिसऱया पदकासाठी पॅरिसच्या कोर्टवर उतरणार आहे. 2016 आणि 2020 अशा दोन्ही स्पर्धांत पदके जिंकण्याचा करिश्मा सिंधूने केला आहे. आता ती हॅटट्रिक करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र गेल्या काही स्पर्धांत तिची कामगिरी समाधानकारक न झाल्यामुळे सारेच चिंतीत आहेत. पण पॅरिसमध्ये तिला सूर गवसेल, अशी अपेक्षा आहे. जर तिने पॅरिसही जिंकले तर ती सलग तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरेल.