मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांमधील तुळशी तलाव गेल्याच आठवडय़ात भरल्यानंतर बुधवारी तानसा आणि आज एकाच दिवसात विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. त्यामुळे मुंबईत 5 जूनपासून सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात पालिकेने मागे घेतली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात तलावांत सध्या 966395 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी 251 दिवस म्हणजे मार्च महिन्यापर्यंत पुरणारे आहे. या पार्श्वभूमीवर तलावांत समाधानकारक पाणीपुरवठा पाहता मुंबईतील पाणीकपात रद्द करीत असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
एकूण 66.77 टक्के जलसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लिटर इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 96639.5 कोटी लिटर इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठय़ाच्या अर्थात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटरच्या तुलनेत 66.77 टक्के इतका आहे.
तीन हजार वाडय़ा-वस्त्यांना अजूनही टँकरचे पाणी
राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी आणि पूरस्थिती आहे. धरणे ओव्हरफ्लो आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, मात्र तरीही राज्यातील तीन हजारांहून अधिक वाडय़ा-वस्त्यांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तेराशेहून अधिक टँकर धावत आहेत. संभाजीनगरमध्ये तर अजूनही पाण्याची भीषण परिस्थिती असल्याचे चित्र आहे.
सध्याचा पाणीसाठा
अप्पर वैतरणा 77484 दशलक्ष लिटर
मोडक सागर 127192 दशलक्ष लिटर
तानसा 143887 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 122549 दशलक्ष लिटर
भातसा 459539 दशलक्ष लिटर
विहार 27698 दशलक्ष लिटर
तुळशी 8046 दशलक्ष लिटर