>> राजेश पोवळे
हरित वसई हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून वसईतील पर्यावरण वाचवण्याचा मोठा लढा उभारणारे आणि ख्रिस्ती समाजाला मराठीशी जोडणारे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अखेरचा श्वास घेतला. दिब्रिटो यांच्या निधनाने अस्सल मराठी वळणाचा सुंदर व प्रासादिक लेखन करणारा सव्यासाची लेखक आणि पर्यावरण चळवळीचा जागल्या हरपला आहे.
वसईतील वटार गावात जन्मलेले जॉन दिब्रित हे पुढे फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणून ओळखले जाऊ लागले. लहानपणापासूनच वाचनाची आवड असलेल्या दिब्रिटोंच्या हाती मराठी साहित्यिकांचे लिखाण आले आणि त्यांची वाचनाची गोडी वाढतच गेली.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी धर्मगुरू होण्याचा निश्चय केला तेव्हा ते अवघे 19 वर्षांचे होते. धर्मगुरू बनण्याचे शिक्षण त्यांनी गोरेगाव येथील सेमिनरी विद्यालयातून घेतले. तेथे अध्यात्मपर ग्रंथ, संत चरित्र यांच्या वाचनाबरोबरच इंग्रजी साहित्याचे मनन, चिंतन केले. दहा वर्षे विविध विषयांवरील शिक्षण घेतल्यानंतर 1972 मध्ये ते धर्मगुरू बनले. मराठी भाषेच्या प्रेमापोटी मराठी साहित्य परिषदेच्या प्राच्य, विशारद आणि साहित्य आचार्य या परीक्षा दिल्यामुळे त्यांना मराठीच्या अंतरंगाची ओळख झाली. 1979 साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या का@लेजियो दि सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. या काळात त्यांना पोप जॉन पॉल आणि मदर तेरेसा यांना भेटता आले.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या लिखाणातील आवडीचे विषय होते. त्यामुळे पंढरपूर, देहू, नेवासे, आळंदी, नांदेड ही माझ्यासाठी तीर्थस्थाने आहेत असे दिब्रिटो आवर्जून सांगत.
दिब्रिटो यांनी महाराष्ट्रातील सर्व नामवंत वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. 1983 मध्ये ‘सुवार्ता’ या चर्चच्या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि या मासिकाचे चाकोरीबद्ध आणि प्रचारकी स्वरूप बदलून त्याला नवे रूप दिले. ख्रिस्ती विचारवंतांबरोबरच मराठीतील मान्यवर लेखकांना त्यांनी ‘सुवार्ता’मधून लिहिते केले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी विचारमंथने घडवून आणली. दिब्रिटो यांनी विविध लेखसंग्रह लिहिले. त्यातील ‘तेजाची पाऊले’ हे पुस्तक वाचून महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांनी त्यांना खास पत्र लिहून त्यांच्या शब्दकळेचा गौरव केला. त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सन्मानित करण्यात आले. 1992 मध्ये पुण्यात झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ‘सुबोध बायबल-नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा साहित्य अकादमीचा 2013 सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला.
80-90 च्या दशकात हरित वसईवर विकासकांची नजर पडली आणि रखरखीत जमिनींनाही सोन्याचा भाव आला. त्यातून अस्ताव्यस्त, बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहू लागली. दिब्रिटो यांनी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना करून त्याविरोधात लढा दिला. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकचळवळ उभारली. मराठी साहित्यिकांनी त्यांना त्यासाठी पत्रे पाठवून बळही दिले. या आंदोलनाची दखल देशपातळीवर घेतली गेली. दिब्रिटो यांच्या निधनाने हरित चळवळीचा ‘फादर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे.