Nanded जिल्ह्यात मुसळधार पाऊस; विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडण्याची शक्यता

नांदेड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत जोरदार ते मध्यम पाऊस होत असून, पावसाची रिमझिम संबंध जिल्ह्यात सुरूच आहे. दरम्यान विष्णूपुरी प्रकल्प पूर्णतः भरल्याने या प्रकल्पाचे दरवाजे कधीही उघडण्यात येतील, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून, रात्रीपासून अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. शहरात आज दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वाहन धारकांची चांगलीच अडचण होत असून, वजिराबाद, वसंतनगर, आनंदनगर, देगलूर नाका, फरांदेनगर, मोर चौक, छत्रपती चौक, तरोडा, भाग्यनगर, आनंदनगर या भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. निधी न मिळाल्याने कंत्राटदारांनी शहरातील तिनशे कोटींची कामे ठप्प ठेवली असून, काही कामे अर्धवट झाल्याने अनेक भागात वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे.

प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वेस्टेशन या मार्गावर जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान आज पडलेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे नांदेड-२६.२० मि.मी., बिलोली-३४, मुखेड-४३.९०, कंधार-३०.१०, लोहा-३२.२०, हदगाव-१८.८०, भोकर-२२.६०, देगलूर-३७.२०, किनवट-२३.२०, मुदखेड-३४.४०, हिमायतनगर-१७.४०, माहूर-१४.६०, धर्माबाद-२६.२०, उमरी-२९.३०, अर्धापूर-२७.१०, नायगाव-२३.३० मि.मी. जिल्ह्यात आजपर्यंत ४०० मि.मी. पाऊस झाला असून, जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ८९१.३० मि.मी. एवढी आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणार्‍या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे. त्यामुळे कधीही बंधार्‍याच्या दाराला उघडले जाऊ शकते. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल. प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. २५ रोजी ८३ टक्के क्षमतेने भरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधार्‍यात येणार्‍या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधार्‍याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे.

त्यामुळे विष्णुपुरी बंधार्‍याच्या खालच्या बाजूस असणार्‍या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताचे, पशुधनाचे नुकसान होणार नाही, यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.