
मुंबईत मराठी माणसांना घरं नाकारल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत नोकऱ्यांमध्येही मराठी तरुणांना ‘नो एन्ट्री’ केली जात आहे. गुजरातच्या एका कंपनीने डिझायनर पोस्टसाठी दिलेल्या जाहिरातीत ‘मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये’ असे नमूद केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता असाच एक प्रकार नव्याने घडला आहे.
मुंबईतील अंधेरी भागामधील मरोळ येथे असणाऱ्या ‘आर्या गोल्ड’ नावाच्या कंपनीने Indeed या वेबसाईटवर मॅनेजर या पदासाठी जाहिरात दिली होती. फक्त पुरुष उमेदवार आणि ‘नॉन महाराष्ट्रीय’ (अमराठी) उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील असा उल्लेख या जाहिरातीत करण्यात आला होता. ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर मराठी तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर उपरती झाल्याने कंपनीने जाहिरातीमध्ये बदल केला.
गुजरातच्या कंपनीने मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारली! लिंक्डिनवरील जाहिरातीनंतर तीव्र संतापाची लाट
कारवाईची मागणी
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. परप्रांतातून लाखो लोक इथे नोकरीनिमित्त येतात. लाखो परप्रांतीय मुंबईत वास्तव्य करतात. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे येथील नोकऱ्यावर मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे. असे असतानाही जाहीररीत्या मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा उद्दामपणा करणाऱ्या कंपनीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.