प्रो कबड्डी लीग (पीकेएल) स्पर्धा 26 जुलै 2024 रोजी आपला दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. याच निमित्ताने मशाल स्पोर्टस या प्रमुख आयोजकांनी पीकेएलच्या अकराव्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. मुंबई येथे येत्या 15 व 16 ऑगस्ट रोजी हा लिलाव पार पडणार आहे.
सुमारे एका दशकापूर्वी ‘यु मुंबा’ आणि ‘जयपूर पिंक पँथर्स’ यांच्यातील सामन्याने मुंबई येथे सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगचा प्रवास 2 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024 दरम्यान झालेल्या दहाव्या यशस्वी मोसमाच्या आयोजनापर्यंत आला. तब्बल दहा मोसम पूर्ण करणारी देशातील केवळ दुसरीच स्पोर्टस लीग स्पर्धा ठरली आहे.
दरम्यान, मशाल स्पोर्टसच्या वतीने प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठी नव्या बोध चिन्हांचे अनावरण करण्यात आले आहे. या बोध चिन्हात हिंदुस्थानी राष्ट्रध्वजाच्या भगव्या आणि हिरव्या रंगाची संगती साधण्यात आली आहे. त्यामुळे कबड्डी हा देशाचा प्रमुख मैदानी खेळ असल्याचे अधोरेखित झाले आहे.
प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी यावेळी बोलताना म्हणाले की, प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव स्वातंत्र्यदिनी आयोजित करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. गेल्या अनेक शतकांपासून देशाच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य दाखवणार आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण खेळ असलेल्या कबड्डीचे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक खेळ म्हणून प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन केले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सर्व गुंतवणूक दार, प्रायोजक आणि अखिल हिंदुस्थानी कबड्डी महासंघांशी संलग्न असलेले सर्व घटक यांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. अकराव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव करताना एक खास कार्यक्रम सादर करून आम्ही गाठलेला हा टप्पा साजरा करण्याचा आमचा मनोदय आहे.
दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठी खेळाडूच्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस क्रिडा वाहिन्यांवरून आणि डिस्ने प्लस हॉट स्टार ओटीटी चॅनल वरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.