Pune Rain Update: लवासात दोन बंगल्यांवर दरड कोसळली, काही जण अडकल्याची भिती

पुणे जिल्ह्यात आज पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग झाल्यानं शहराला मुठा नदीचा वेढा पडला आहे. तर जिल्ह्यात संततधार पाऊसही सुरू आहे. यामुळे पुण्याच्या मुळशी तालुक्यात असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. या दरडी कोसळल्याने दोन बंगले मातीच्या ढीगा खाली दबले गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही बंगले गाडले गेले आहेत. या बंगल्यांमध्ये तीन ते चार लोक अडल्याची माहिती दिली आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था ‘सतर्क’ने याची माहिती आणि फोटो देखील पोस्ट केले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि घाट माथा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा आज वाढलेला जोर आणि खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे पुण्याला पाण्याचा वेढा पडला आहे. पुण्यात सिंहगड रोडवर सोसायटांच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं आहे. यामुळे या भागात मदत कार्य सुरू आहे. लवासामध्ये दरड कोसळल्यानंतर काही लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र बचाव पथक अद्याप तिथे पोहोचले नसल्याचं वृत्त आहे.