देशात मोदी-शहा अन् महाराष्ट्रात फडणवीसांचा उदय झाल्यापासून ‘गटारी’ पॉलिटिक्स सुरू झालं, संजय राऊत कडाडले

भारतीय जनता पक्षाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लीप बनवण्यात धन्यता मानली. भाजपचा क्लीपचा कारखाना असून तेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या क्लीप असल्याचे विधान केले होते. यावरून राऊत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन रेकॉर्डिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बसवून प्रतिष्ठा दिली. आमच्या सर्वांचे फोन ज्यांनी चोरून ऐकले किंवा चोरून ऐकायला दिले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, निलंबित होणार होत्या अशा महिला अधिकाऱ्याला सरकार बदलताच फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक केले. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या लोकांचे देशात आणि राज्यपातळीवर याची क्लीप बनवा, त्याची क्लीप बनवा हेच सुरू आहे. ही राज्याची संस्कृती आहे का? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या अध:पतनाला देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी जबाबदार आहे. लोकांचे फोन टॅप करा, क्लीप करा आणि मी माणसं फोडली हे अभिमानाने सांगतात. गृहमंत्र्यांना हे शोभते का? नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळाला आहे, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची प्रतिष्ठा ठेवली नाही. भाजपला प्रतिष्ठा नाहीच, पण स्वत:ची नाही तर राज्याची तरी प्रतिष्ठा ठेवायची. देशात आणि महाराष्ट्रात 70-75 वर्षापासून राजकारण सुरू आहे. पण अशा प्रकारचे घाणेरडे पॉलिटिक्स कधी कुणी केले नाही. देशात अमित शहा आणि नरेंद्र मोदी आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून घाणेरडे, गटारी पद्धतीचे पॉलिटिक्स सुरू झाल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

बिहारला पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी 18 हजार कोटी; महाराष्ट्राला दमडीही नाही, हा दुजाभाव का? संजय राऊतांचा सवाल

दरम्यान, अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही राऊत यांनी परखड भाष्य केले. हा आताचा विषय नसून अनिल देशमुख यांनी चार-पाच महिन्यांपूर्वी सार्वजनिक मंचावरून हा गौप्यस्फोट केला होता. ईडीच्या प्रकरणातून नाव काढायचे असेल, अटक टाळायची असेल तर आमचे ऐका हे भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना आणि मलाही सांगितले. अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल, मिध्यांबरोबरचे आमदार, खासदार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक तिथे का गेले? ईडीपासून वाचण्यासाठी हे सर्व गेले. देशमुख जे सांगत आहेत ते सत्य आहे. पण अनेकदा सत्याला पुरावा नसतो, असे राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

न्याय यंत्रणा नादात झालीय

अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळत नसल्याच्या प्रश्नावरही राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ज्यांना अटक करायला पाहिजे, खटले दाखल केले पाहिजे आणि तुरुंगात टाकायला पाहिजे ते सगळे लोकं इतर पक्षातून बाजपने आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना मंत्रिमंडळात, संसदेत, लोकसभेत आणि राज्यसबेत बसवले. पण ज्यांच्यापासून त्यांना भीती वाटते त्या अरविंद केजरीवाल सारख्या नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यांना तुरुंगातून जामीनही मिळू नये हा सत्तेचा आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर आहे. न्याय यंत्रणा नादान झालीय. त्यामुले हे सर्व घडत आहे, असेही राऊत म्हणाले.