
महाराष्ट्रात अत्यंत भयंकर अशी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्हे, मुंबई, कोकणसह अनेक ठिकाणी पूरस्थितीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. काल संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पूरपरिस्थिताचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी देण्यात आले. पण महाराष्ट्राला एक दमडीही मिळाली नाही. बिहारला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय, हा दुजाभाव का? असा खणखणीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि नॉन बायोलॉजिकल बजेटची वाहवा करणारे भाजप व मिंधे गटाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर मौन का? बिहारला पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी 18 हजार कोटी दिले, आम्हाला निदान 1 हजार किंवा 1800 कोटी तरी द्या. हे सांगण्यासाठी हिंमत सरकारमध्ये नसून त्यांनी फक्त महाराष्ट्रात सत्तेच्या खुर्च्या उबवू नयेत, असा घणाघात राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, बिहारला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? बिहारला मिळालयलाच हवे. बिहार देशाचाच एक भाग आहे. पण त्याच प्रकारची पूरपरिस्थिती महाराष्ट्रातही आहे. पण महाराष्ट्राला या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी एक दमडीही मिळालेली नाही. त्यावर आत बजेट पाहण्यासाठी पेन-पेन्सील घेऊन बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणणे आहे? असा बोचरा सवाल राऊत यांनी केला.
दरम्यान, शेतकरी नेत्यांनी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सरकारने हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण केले नाही असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. यावरही राऊत यांनी भाष्य केले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हमीभावासंदर्भात निर्णय होईल असे वाटले होते. पण समर्थनमुल्य कोणाला मिळाले तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना. सरकारला समर्थन दिले म्हणून या दोन नेत्यांना समर्थनमुल्य मिळाले, पण शेतकऱ्यांना नाही. हे दुर्दैवी आहे, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
View this post on Instagram
सामना अग्रलेखावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, सरकारचे संपूर्ण राजकारण खंडणीतूनच चालले आहे. अर्थसंकल्पामध्येही जनतेच्या पैशाचा वापर करून सरकार वाचवण्यासाठी हजारो कोटी रुपये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना खंडणी म्हणून दिली. अशाच प्रकारे खंडणी देऊन त्यांनी आपले सरकार वाचवले आणि निर्माणही केल्याचा आरोप राऊत यांनी केला.