ठाण्यात सरकारची ‘लाडका ठेकेदार’ योजना; कोट्यवधी खर्चुनही गायमुख रस्त्याच्या चिंधड्या

घोडबंदर रोडवरील गायमुख घाटाच्या पाचशे मीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पहिल्यांदाच अमेरिकन तंत्रज्ञान व ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करून करण्यात आले. यासाठी दीड कोटींचा चुराडा करण्यात आला. मात्र पावसाने या फुटकळ कामाचे अवघ्या दीड महिन्यात ‘तीन तेरा’ वाजवले असून ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांनी या मार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे सरकारने कोट्यवधींचा केलेला खुर्दा लाडक्या कंत्राटदारासाठी केला का, असा सवाल ठाणेकरांनी विचारला आहे.

घोडबंदर रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रोजच वाहतुकीचा जांगडगुत्ता होतो. गायमुख परिसरात तर भयंकर परिस्थिती असून खड्डेमय प्रवासाने वाहनचालकांसह प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 27 मे रोजी गायमुख घाटाच्या पाचशे मीटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेत एका कंत्राटदाराला वार्षिक दुरुस्ती खर्चातून दीड कोटी रुपये देण्यात आले. मात्र या ठेकेदाराने परदेशी तंत्रज्ञान वापरून रस्ता करतो असे सांगून अक्षरशः थुकपट्टी लावली.

त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात केलेला रस्ताच धुऊन गेला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन ढिम्म असून संबंधित कंत्राटदाराला नोटीस किंवा दंड आकारण्यात आलेला नाही अशी माहिती समजते. त्यामुळे हा ठेकेदार सरकारमधील कोणत्या बड्या नेत्याच्या मर्जीतील आहे की अधिकाऱ्यांच्या गुडबुकमधील, असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

खड्डे भरणीतून कोणत्या ठेकेदाराचा खिसा भरला?

रस्त्यावर नव्याने मास्टिकच्या सहाय्याने खड्डे भरणी मोहीम हाती घेण्यात आली, मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने कोट्यवधी खर्च करून खड्डे भरणीच्या नावाखाली नेमका कोणत्या ठेकेदाराचा खिसा भरला.. सरकारमध्ये वजन असलेल्या लाडक्या कंत्राटदारांसाठी तर ही योजना राबवली नाही ना, अशी चर्चा सुरू असून या कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांचे कानावर हात

रस्ता इतका टुकार केला होता की, पहिल्याच पावसात रस्त्यावरचे डांबर वाहून गेले आणि ठिकठिकाणी खड्डे पडले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी कंत्राटदाराचे नाव सांगण्यास नकार दिला. त्याशिवाय केलेल्या खर्चाचा तपशील दिला नाही. त्यामुळे अधिकारी या ठेकेदाराबाबत कानावर हात ठेवत असल्याने त्याला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल विचारला जात आहे.