.. आणि प्रवाशांना पाहून महिला टीसीच पळाल्या

विना गणवेश रेल्वे स्थानकात तिकीट तपासणे दोन महिला टीसींना चांगलेच महागात पडले आहे. महिला टीसींनी तिकीट तपासण्यास सुरुवात करताच त्यांच्यावर प्रवाशांनी प्रश्नांचा भडीमार केला व नियमबाह्य कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर प्रवाशांचा संताप पाहून टीसींना तेथून पळ काढावा लागला.

हर्बल रेल्वे मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकात दररोज अंदाजे 100 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई नियमबाह्य पद्धतीने केली जात असल्याचे नवीन पनवेलमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा कार्यकर्ते रितेश ठक्कर यांनी उघडकीस आणले आहे. ठक्कर हे रेल्वे स्थानकात गेले असता त्यांना दोन महिला तिकीट तपासणी करत असल्याचे दिसून आले. त्या महिलांनी गणवेश घातलेला नव्हता त्यांच्याकडे रेल्वेचा बॅच व ओळखपत्रदेखील नसल्याने त्यांनी त्या दोघींना जाब विचारला. दरम्यान प्रवाशांनी घेराव करून प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर त्यांनी काढता पाय घेऊन पळ काढला.