
बोगस कागदपत्रे बनवून पाकिस्तानला पळालेली ठाण्यातील नगमा नूर मकसूदअली उर्फ सनम खान या महिलेने पाकिस्तानच्या बशीर अहमदसोबत ‘ऑनलाइन’ निकाह केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पाकिस्तानचा व्हिसा मिळावा म्हणून तिने ‘ऑनलाइन’ निकाह करून त्याची कागदपत्रे बनवली व थेट पाकिस्तान गाठले. मात्र ती अचानक ठाण्यात परतली असून पोलिसांनी बोगस कागदपत्रे बनवून पाकिस्तान गाठल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करून तिच्याभोवती चौकशीचा फास आवळला आहे. मात्र दुसरीकडे नगमाने हे सर्व आरोप फेटाळल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
सनम खान हिचे 14 जून 2012 साली यूपीतील तरुणासोबत निकाह झाला होता. तिने दोन मुलींना जन्मदेखील दिला. मात्र पती बेरोजगार असून मारहाण करत असल्याने ती पतीला सोडून ठाण्यातील लोकमान्यनगर येथे आपल्या आईकडे आली. दरम्यान 2021 मध्ये फेसबुकवरून पाकिस्तानातील वशीरसोबत तिची ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी तिने पासपोर्ट तयार केले आणि व्हिसासाठी अर्ज केला. पासपोर्ट नवीन असल्याने तिला व्हिसा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे तिने 24 फेब्रुवारी 2024 ला वशीरसोबत ‘ऑनलाइन’ निकाह केला. त्यानंतर वशीरने ही निकाह रजिस्टरीची पाकिस्तानच्या नादरामध्ये नोंद करून व्हिसा मंजर करून घेतला.
एबोटाबाद, रावळपिंडीत तीन महिने
वशीर रावळपिंडी येथील हॉटेलमध्ये कामाला असल्याने ती त्याच्यासोबत तिथे राहिली. नंतर ती एबोटाबादमध्ये राहिली. तीन महिने तिथे राहिल्यानंतर आई आजारी असल्याचे कारण देत ती पुन्हा मुंबईला आली.
ठाणे ते पाकिस्तानचा प्रवास
व्हिसा मिळाल्यानंतर तिने जून 2024 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाण्याहून दिल्ली आणि दिल्लीहून चंदीगड, अमृतसर असा प्रवास करून पाकिस्तान दूतावासासोबत संपर्क केला आणि तिथून वाघा बॉर्डर येथून चेकपोस्ट क्रॉस करून पाकिस्तान गाठले.
दहशतवाद्यांशी कनेक्शनचा तपास?
पाकिस्तानातील एबोटाबाद येथे आयएसआय आणि दहशतवादी संघटना व लष्करे तोयबाचा तळ आहे. नगमा तीन महिने याच परिसरात वशीरसोबत मुक्कामास होती. वशीरचा लष्करे तोयबाशी काही संबंध आहे का? नगमा त्यांच्या संपर्कात आली होती का? याचीही कसून चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.
कसून चौकशी
वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी तिच्या विरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ती ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिची सर्व कागदपत्रे जमा करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तिला अद्याप अटक झालेली नाही. याचा तपास अनेक केंद्र सरकारच्या यंत्रणा करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावर याबाबत सर्व माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.
2015 साली मी आधारकार्डवरील नगमा मकसूदअली नाव बदलून सनम खान केले. नाव बदलल्यानंतर 9 वर्षांनी मी वशीरसोबत लग्न केले. त्यासाठी मी कोणतेही पुरावे, बोगस कागदपत्रे आणि पासपोर्ट बनवलेले नाही. मी अधिकृतपणे पाकिस्तानी पासपोर्ट तयार केले आहे.
– सनम खान