शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारवर दबाव आणणार; राहुल गांधी यांचे शेतकरी शिष्टमंडळाला वचन

शेतकऱयांना शेतमालासाठी किमान हमीभावाचे कायदेशीर वचन मिळावे यासाठी इंडिया आघाडी सरकारवर दबाव आणेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसद भवन संकुलात शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर सांगितले.

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू आणि कर्नाटकातील 12 शेतकरी नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

शेतकऱयांना संसद प्रवेशापासून रोखले

राहुल यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱयांना प्रारंभी संसद संकुलाबाहेरच अडवण्यात आले होते. त्यांना प्रवेश न दिल्याच्या निषेधार्थ राहुल यांनी एक्सवर पोस्ट केली. आम्ही त्यांना आमंत्रित केले आहेपण ते त्यांना संसदेत येऊ देत नाहीत. ते शेतकरी आहेत, कदाचित त्यामुळेच त्यांना रोखण्यात आले आहे. याचे कारण तुम्हाला पंतप्रधानांना विचारावे लागेल, असे राहुल यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.