साईभक्तांच्या श्रद्धेला रोखता येणार नाही. निनावी दानात गैर काय, अशा कडक शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी आयकर विभागावर ताशेरे ओढले. दानात भक्तांच्या भावना असतात. भावनांना आवर घालता येत नाही, अशी न्यायालयाने आयकर विभागाची कानउघाडणी केली.
धर्मादाय व धार्मिक अशा दोन्ही व्याख्या साईबाबा संस्थानाला लागू होतात. निनावी येणाऱया दानासाठी संस्थानाला आयकरात सूट मिळू शकते, असे आयकर अपील प्राधिकरणाने स्पष्ट केले. त्याविरोधात आयकर विभागाने याचिका केली आहे. न्या. गिरीश पुलकर्णी व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
साईबाबा संस्थान धर्मादायही
साईबाबा संस्थान धार्मिक संस्था नसून धर्मादायही आहे. या संस्थानाला 2019 पर्यंत 400 कोटींचे दान मिळाले. त्यातील केवळ 2 कोटी 30 लाख रुपये संस्थानाने धार्मिक कार्यासाठी खर्च केले. शैक्षणिक, वैद्यकीय सेवांसाठी संस्थानाकडून अधिक पैसे दिले जातात. याचा अर्थ संस्थान धर्मदाय संस्था आहे, असा दावा आयकर विभागाने केला.
साईबाबा संस्थान धार्मिकच
साईबाबा संस्थान धार्मिक असल्याचा निर्वाळा याआधी न्यायालयाने दिला आहे. मग हे संस्थान धर्मादाय असल्याचा दावा आयकर विभाग कोणत्या आधारावर करत आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. साईबाबा दत्ताचे अवतार आहेत, असे माझ्या वाचनात आले आहे. त्यांच्यावर श्रद्धा असल्याने संस्थानाला दान दिले जाते, असेही न्यायालयाने नमूद केले.
आम्ही दोन्ही जबाबदाऱया पार पाडतो
साईबाबा मंदिरात हिंदू आणि मुस्लिम धर्मीयही येतात. मंदिरात पूजा केली जाते तसेच आम्ही गरजूंना मदतही करतो. धार्मिक व धर्मादाय, अशा दोन्ही व्याख्या संस्थानाला लागू होतात, असा युक्तिवाद वरिष्ठ वकील एस. गणेश यांनी केला. साईबाबा संस्थानाला केवळ धर्मादाय म्हणणे चुकीचे आहे. आम्ही दोन्ही जबाबदाऱया पार पाडतो.
धार्मिक कार्य म्हणून दान
दररोज अनेक भक्त देवळात जातात. दान करतात. दान हा श्रद्धेचा भाग आहे. मोठे उद्योगपती साईबाबासह अन्य मंदिरांना दान देत असतात. माझे नाव घेऊ नका. धार्मिक कार्य म्हणून दान दिले आहे, असे काही भक्त सांगतात. अशा वेळी आयकर विभाग काय करणार, असा सवाल न्यायालयाने केला.